भारताच्या युवा बॉक्सर्सनी धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन करत किकिंडा (सर्बिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण‘पंच’ लगावला. या स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांसह नऊ पदके मिळवली. ए. सिलाम्बरासन स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सर ठरला. सिलाम्बरासन (५२ किलो) याच्यासह मनीष सोलंकी (६९ किलो) याने सुवर्णपदकावर कब्जा केला. महिलांमध्ये पुण्याची चंदा उदानशिवे (५१ किलो) आणि राजेश कुमारी (४८ किलो) यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. जागतिक युवा स्पर्धेतील विजेती ललिता प्रसाद (४९ किलो) व राष्ट्रीय विजेता नीरज पराशर (६४ किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मार्थम्मा सत्तीवदा (६४ किलो), दिक्षा (९१ किलो) आणि पेमा चोटान (९१ किलोवरील) यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
सिलाम्बरासनने आपला फॉर्म कायम राखत स्कॉटलंडच्या स्टीफन बॉयल याचा पराभव केला. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत आक्रमक खेळ करणाऱ्या सिलाम्बरासनला पंचांनी एकमताने विजयी घोषित केले. वेल्टरवेट गटात, सोलंकीने सर्बियाच्या स्टॅनोजेव्हिक लझारचा पाडाव केला. महिलांमध्ये, राजेश कुमारीने अंतिम फेरीत बल्गेरियाच्या पोप्टोलेव्हा व्हॅलेन्टिनाला हरवले. पुण्याचा चंदाने फ्लायवेट गटात बल्गेरियाच्या बुयुखलिएव्हा मारिनाचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.