वेगाचा बादशाह सेबॅस्टियन वेटेल नावाचा महिमा काय आहे, हे ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचे भाग्य भारतीय चाहत्यांना लाभले. भारताच्या फॉम्र्युला-वन इतिहासात रविवारचा दिवस नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. सेबॅस्टियन वेटेलने इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत जेतेपदांची हॅट्ट्रिक नोंदवत सलग चौथ्यांदा विश्वविजेता होण्याची किमया साधून भारतीय चाहत्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली. त्याचबरोबर वेटेलच्या जेतेपदामुळे रेड बुलनेही सलग चौथ्यांदा सांघिक जेतेपदावर मोहोर उमटवली. अद्भुत, अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या वेटेलने आपणच वेगाचे जादूगार असल्याचे दाखवून दिले.
सलग चार वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारा वेटेल हा सर्वात युवा ड्रायव्हर ठरला आहे. या जेतेपदांसह सलग चार जेतेपदे पटकावणाऱ्या जुआन मॅन्युएल फॅगिंयो आणि मायकेल शूमाकर या महान ड्रायव्हर्सच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवले. वेटेलला विश्वविजेतेपद निश्चित करण्यासाठी फक्त काही गुणांची आवश्यकता होती, पण थेट जेतेपदालाच गवसणी घालत वेटेलने आपली गुणवत्ता दाखवून दिली. मर्सिडिझचा निको रोसबर्गने सुरेख कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली. लोटसच्या रोमेन ग्रॉसजेनने थेट १७व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी मजल मारली.
फॉम्र्युला-वन शर्यतीची सुरुवात म्हणजे अपघातांना आमंत्रण. काही सेकंदांच्या कालावधीत एकमेकांना मागे टाकण्याच्या चढाओढीत हमखास कारची टक्कर होते. इंडियन ग्रां. प्रि.च्या सुरुवातीलाही हा थरार अनुभवता आला. फेरारीचा फर्नाडो अलोन्सोला मागे टाकताना मर्सिडिजची कार स्पर्श करून गेली. अव्वल स्थानावरून सुरुवात करणाऱ्या वेटेलने अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली, पण काही मिनिटांतच टायर बदलण्यासाठी पिट-लेनमध्ये (गॅरेज) जावे लागल्याने तो बराच मागे पडला. तोपर्यंत फेलिपे मासा आणि मार्क वेबर हे अग्रेसर होते. मासाने पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली, पण २१व्या लॅप (फेरी) दरम्यान वेटेल १२व्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यानंतर त्याची अव्वल स्थानासाठी सहकारी मार्क वेबरशी चुरस रंगली, पण वेबरच्या कारच्या गीअरबॉक्समध्ये बिघाड झाल्यामुळे त्याला शर्यत अर्धवट सोडून द्यावी लागली. ३५व्या लॅपला अव्वल स्थानी आल्यानंतर संपूर्ण शर्यतीवर वेटेलने अधिराज्य गाजवले.
स्पर्धेच्या अखेरच्या क्षणी ५२व्या लॅपला निको रोसबर्गने आघाडी घेतली ती अखेपर्यंत टिकवली. दरमजल करत एकेक स्थानाने पुढे येत ग्रॉसजेनने तिसरे स्थान पटकावले. एका क्षणी अव्वल स्थान काबीज करण्याच्या स्थितीत असलेला फेलिपे मासा याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मॅकलॅरेनच्या सर्जिओ पेरेझने पाचवे स्थान प्राप्त केले.
फोर्स इंडियाची चमकदार कामगिरी
ल्ल इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत गुण मिळवणे कठीण असल्याचे आधीच जाहीर करणाऱ्या फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सनी चमकदार कामगिरी करत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावले. ४०व्या लॅपपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या एड्रियन सुटीलने पहिला पिट-स्टॉप (कारच्या दुरुस्तीसाठी वेळ) घेतला आणि त्याची आठव्या क्रमांकावर घसरण झाली. त्याचा सहकारी पॉल डी रेस्टाने नववे स्थान पटकावत फोर्स इंडियाला एकूण सहा गुण मिळवून दिले.
“अंतिम रेषा पार केली आणि मी नि:शब्द झालो. मला काहीही सुचत नव्हते. हा मोसम माझ्यासाठी फारच आव्हानात्मक होता. प्रत्येक वेळी माझ्यावर बोचरी टीका झाली, पण ट्रॅकवर उतरल्यानंतर मी टीकाकारांना चोख उत्तर दिले. विश्वविजेतेपद मिळाल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मला स्वत:चाच अभिमान वाटत आहे.“
सेबॅस्टियन वेटेल