फॉर्म्युला वन शर्यत तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हवेच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंना बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक फॉर्म्युला वन रेसर तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. तरुणाईच्या अशाच एका लाडक्या खेळाडूंनी फॉर्म्युला वनमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. चार वेळा विश्वविजेता सेबॅस्टियन वेटेलने गुरुवारी (२८ जुलै) निवृत्तीची जाहीर केली. हा हंगाम (२०२२) त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम ठरणार आहे.
सध्या अॅस्टन मार्टिन संघाचा चालक असलेला ३५ वर्षीय सेबॅस्टियनने २०१० ते २०१३ मध्ये रेड बुलकडून खेळताना चार विजेतेपदं पटकावली होती. याशिवाय, त्याने फेरारीसोबत सहा हंगाम खेळ केला होता. हंगेरियन ग्रँड प्रिक्सपूर्वी त्याने निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला आहे.
“गेल्या १५ वर्षांत फॉर्म्युला वनमध्ये अनेक विलक्षण लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाला आहे. त्यांचा उल्लेख करण्यासारखे आणि आभार मानण्यासारखे बरेच आहेत. दोन वर्षांपासून मी अॅस्टन मार्टिन अरॅमको कॉग्निझंट फॉर्म्युला वन संघाचा चालक आहे. आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मात्र, संघाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकत्रपणे केल्या जात आहेत,” असे सेबॅस्टियन म्हणाला.
हेही वाचा – VIDEO : शिखर धवनच्या प्रश्नावर ड्रेसिंग रूममध्ये पिकला हशा; विजयानंतर साजरा केला जल्लोष
“निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते. मी याबद्दल विचार करण्यात बराच वेळ घालवला आहे. वर्षाच्या शेवटी मी पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करेन. एक वडील म्हणून मला माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे. चाहत्यांशिवाय फॉर्म्युला वनचे अस्तित्व टिकू शकणार नाही. त्यामुळे सर्वांचे आभार “, अशा शब्दांमध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली.
पूर्णवेळ चालक म्हणून स्थान मिळवण्याआधी त्याने बीएमडब्ल्यू सॉबरसाठी चाचणी चालक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. पूर्णवेळ चालक म्हणून त्याची कारकिर्द गौरवशाली राहिली. त्याने चार जागतिक विजेतेपदे, एकून ५३ विजय, ५७ पोल पोझिशन्स आणि १२२ पोडियम फिनिशसह कारकीर्दाचा शेवट केला.