भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यातही संघर्षपूर्ण क्रिकेटची पर्वणी मिळणार, अशी वातावरण निर्मिती झाली होती. जॉर्ज बेली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २९६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने ४ षटकांत बिनबाद २७ अशी सुरुवात करत या लक्ष्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. मात्र यानंतर वरुणराजाचे आगमन झाले. पावसाचा जोर वाढतच गेला आणि पंचांनी अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा सामना रद्द झाल्याने सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी २-१ अशी कायम आहे. पुढचा सामना २६ ऑक्टोबरला कटकला होणार आहे.
धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जागी शमी मोहम्मद आणि जयदेव उनाडकट यांना संधी मिळाली. शमी मोहम्मदने दुसऱ्याच षटकात आरोन फिन्चला त्रिफळाचीत करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यापाठोपाठ त्याने फिलीप ह्य़ुजेसला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. तडाखेबंद फलंदाज शेन वॉटसनला तंबूत पाठवत शमीने ऑस्ट्रेलियाची ३ बाद ३२ अशी बिकट अवस्था केली. अ‍ॅडम व्होग्सने कर्णधार जॉर्ज बेलीला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. त्याने ७ धावा केल्या. यानंतर बेली आणि ग्लेन मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांना नामोहरम केले. सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देणाऱ्या या जोडीने स्थिरावल्यानंतर चौकार-षटकारांची बरसात केली. या जोडीच्या प्रभावापुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलिया सहजपणे साडेतीनशेचा धावांचा टप्पा गाठेल, असे चित्र होते. शतकाकडे कूच करणाऱ्या बेलीचा विनय कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि तो बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ९४ चेंडूत ९८ धावा केल्या. विनय कुमारने मॅक्सवेलला पायचीत केले. स्थिरावलेले दोन्ही फलंदाज माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाची गती मंदावली. या जोडीने २२.४ षटकांत १५३ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. शमी मोहम्मदने सर्वाधिक ३ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ८ बाद २९५ (जॉर्ज बेली ९८, ग्लेन मॅक्सवेल ९२, शमी मोहम्मद ३/४२) विरुद्ध भारत : ४.१ षटकांत बिनबाद २७ (शिखर धवन १४, रोहित शर्मा ९).
निकाल : सामना पावसामुळे रद्द.

Story img Loader