वृत्तसंस्था, डसेलडॉर्फ (जर्मनी)

ऑस्ट्रियाच्या खेळाडूकडून पूर्वार्धात झालेल्या स्वयंगोलमुळे फ्रान्सला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात करण्यात यश आले. मात्र, तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार किलियन एम्बापेच्या दुखापतीने फ्रान्सला चिंतेत टाकले आहे.फ्रान्सने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रियाचा १-० असा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रियाचा बचावपटू मार्क वेबरकडून झालेल्या स्वयंगोलमुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. त्यानंतर उत्तरार्धात फ्रान्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांच्या आक्रमकांमध्ये अचूकतेचा अभाव दिसून आला. यातही एम्बापेला आलेले अपयश आणि सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात त्याला झालेली दुखापत यामुळे फ्रान्सची चिंता वाढली आहे.

हवेतून आलेला पास घेण्याच्या नादात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात ऑस्ट्रियाच्या केव्हिन डॅन्सोशी एम्बापेची जोरदार धडक झाली. यात एम्बापेच्या नाकाला मार बसला. रक्तबंबाळ अवस्थेत एम्बापे मैदानात बसून होता. ऑस्ट्रियाचा गोलरक्षक पॅट्रिक पेंटझने इशारा करून तातडीच्या वैद्याकीय मदतीची मागणी केली. मैदानावरच प्राथमिक उपचार सुरू असतानाच नाकावर सूज येऊ लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. आता त्याच्या उर्वरित स्पर्धेतील सहभागावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘‘एम्बापेसारखा खेळाडू खेळू न शकल्यास आमची बाजू निश्चित दुबळी पडेल,’’ असे फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉम्प म्हणाले.

हेही वाचा >>>MS Dhoni : माहीने पुन्हा जिंकली मनं, फार्म हाऊस बाहेर कार थांबवत चाहत्याची ‘ही’ इच्छा केली पूर्ण, VIDEO होतोय व्हायरल

विशेष मास्क घालणार?

एम्बापेला खेळवण्याचा निर्णय झालाच, तर नाक सुरक्षित राहील असा विशेष मास्क घालून त्याला मैदानात उतरावे लागणार आहे. कतार येथे झालेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाचा बचावपटू जोस्को गॉर्डियोलने असा मास्क परिधान केला होता.

शस्त्रक्रिया अनिवार्य, पण…

एम्बापेच्या नाकाला झालेली दुखापत गंभीर आहे. मैदानातून त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आले. चाचणीनंतर त्याच्या नाकाचे हाड मोडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर शस्त्रक्रिया अनिवार्य असल्याचे मानले जात आहे. स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता तातडीने शस्त्रक्रियेचा विचार करण्यास संघ व्यवस्थापन तयार नसल्याचे समजते. काही आधुनिक चाचण्या करुन उपचार केले, तर शस्त्रक्रिया करावी लागणार नाही, असे संघ व्यवस्थापनाचे मत आहे.

युरो फुटबॉल स्पर्धेत आज

क्रोएशिया वि. अल्बेनिया

वेळ : सायं. ६.३० वा.

वेळ : रात्री ९.३० वा.

वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २,

जर्मनी वि. हंगेरी

स्कॉटलंड वि. स्वित्झर्लंड