डेन्मार्क खुल्या स्पर्धेत अनपेक्षित पराभवांना सामोरे गेलेल्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी फ्रान्स सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा या जोडीला सलामीच्या लढतीतच पराभवाचा धक्का बसला.
चौथ्या मानांकित सायनाने थायलंडच्या निचाऑन जिंदापॉनवर १२-२१, २१-१६, २१-१३ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये बऱ्याच चुका करत तिने ह गेम गमावला. दुसऱ्या गेममध्ये १२-१२ अशी बरोबरी असताना सायनाने सलग पाच गुणांची कमाई करत आगेकूच केली आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या गेममध्येही अटीतटीच्या मुकाबल्यात १४-१३ अशी गुणस्थिती होती मात्र त्यानंतर सलग सात गुण पटकावत सायनाने तिसऱ्या गेमसह सामना जिंकला. दुसऱ्या फेरीत सायनाची लढत कोरियाच्या यिआन ज्यु बेईशी होणार आहे.  
डेन्मार्क येथील स्पर्धेत सिंधूला सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवातून सावरत सिंधूने पुनरागमन केले. तिने कोरियाच्या जि ह्य़ुन स्युंगवर २१-८, २१-१२ असा विजय मिळवला. स्युंगनेच डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आणले होते. सिंधूने प्रदीर्घ रॅली, नेटजवळून सुरेख खेळाच्या जोरावर स्युंगला निष्प्रभ केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली होती. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये (आयबीएल) अवध वॉरियर्स संघातर्फे खेळतानाही तिने चांगली कामगिरी केली होती.
आयबीएल स्पर्धेदरम्यान शिस्तभंगाच्या आरोपांखाली भारतीय बॅडमिंटन संघातर्फे आजीवन बंदीची शिफारस झालेल्या ज्वाला गट्टाचे पुनरागमन यशस्वी ठरले नाही. इंडोनेशियाच्या गेबी रिस्टियानी इमावान आणि तिअरा रोसालिआ नुराईडिनने ज्वाला-अश्विनी जोडीला २१-१८, १३-२१, २१-१७ असे नमवले. अन्य लढतींत, थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रास्टर्य़ुकने अरुंधती पनतावणेचा २१-१७, १३-२१, २१-१७ असा पराभव केला.

Story img Loader