एपी, लॅपझिग
गोल करण्याच्या संधी दोन्ही संघांकडून गमाविण्यात आल्यानंतर युरो फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स व नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला उत्तरार्धात नेदरलँड्सला नाकारण्यात आलेल्या गोलमुळे निर्माण झालेल्या वादाचे गालबोट लागले. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेत आणि योग्य मास्कच्या अनुपलब्धतेमुळे अखेर फ्रान्सने कर्णधार किलियन एम्बापेला या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. फ्रान्स आणि नेदरलँड्स दोघांचेही आता दोन सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. ऑस्ट्रियाचे तीन गुण आहेत. पोलंडची पाटी कोरी आहे. सलग दुसऱ्या पराभवाने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता फ्रान्सचा अखेरचा सामना पोलंड, तर नेदरलँड्सचा सामना ऑस्ट्रियाशी होणार आहे.
एम्बापेच्या गैरहजेरीत अॅन्टोनी ग्रीझमनने नेतृत्व केले. ग्रीझमनला दोन्ही सत्रात गोल करण्याच्या एकेक संधी मिळाल्या होता. पण, त्यावर गोल करण्यात ग्रीझमनला अपयश आले. दोन्ही संघ विजयासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना नेदरलँड्सच्या झावी सिमोन्सने सामन्याच्या ६९व्या मिनिटाला गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. सामन्यात आघाडी घेतल्याचा आनंद सिमोन्सच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पण, पंचांनी फ्रान्स गोलरक्षकाजवळीत नेदरलँड्सचा खेळाडू डुमफ्रीस ‘ऑफसाइड’ असल्याचा निर्णय दिला. तोवर जल्लोषात असलेले मैदानावरील वातावरण एकदम सुन्न झाले. नेदरलँड्सचा प्रत्येक खेळाडू पंचांशी वाद घालत होता. तेव्हा गोलची वैधता ठरविण्यासाठी ‘वार’ प्रणालीकडे निर्णय सोपविण्यात आला. तिसऱ्या पंचांनी निर्णयासाठी जवळपास पाच मिनिटांचा अवधी घेत गोल अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. हा वादग्रस्त प्रसंग वगळता संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांकडून तगड्या बचावाचे प्रदर्शन झाले.
हेही वाचा >>>IND v BAN: “टी-२० मध्ये अर्धशतक शतक करण्याची गरज नसते…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा हे काय बोलून गेला
गोल नाकारणे ही पंचांची चूकच कोव्हमन
नेदरलँड्सचा गोल नाकारण्याचे पडसाद सामना संपल्यावरही उमटत होते. सामना संपल्यावर नेदरलँड्सच्या खेळाडूंनी पंचांशी बोलताना आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. नेदरलँड्सचे प्रशिक्षक रोनाल्ड कोव्हमनही चांगलेच भडकले होते. ‘‘गोलरक्षकाजवळील डुमफ्रीस ‘ऑफसाइड’ होता. पण, तो गोलरक्षकाला विचलित करत नव्हता. जेव्हा असा प्रसंग येतो, तेव्हा तो गोल ग्राह्य धरला जातो. हा निर्णय कठीण होता. म्हणूनच गोलची ग्राह्यता ठरवताना पाच मिनिटे गेली. त्यांचा निर्णयच कळत नाही. हा गोल नाकारणे ही पंच अन्थोनी टेलर यांची चूकच होती,’’ असे कोव्हमन म्हणाले.