न्यूयॉर्क : एकीकडे २७ ग्रँडस्लॅम सामने जिंकलेला अमेरिकेचा फ्रान्सिस टिआफो, तर दुसरीकडे विक्रमी २२ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा राफेल नदाल. २४ वर्षीय टिआफो आणि ३६ वर्षीय नदाल हे कारकीर्दीच्या भिन्न टप्प्यांवर असलेले खेळाडू अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले. या सामन्यात नदाल विजय मिळवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, टिआफोने धक्कादायक निकालाची नोंद करताना नदालची ग्रँडस्लॅम स्पर्धातील सलग २२ विजयांची मालिका खंडित केली.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात टिआफोने नदालवर ६-४, ४-६, ६-४, ६-३ अशी सरशी साधली. टिआफोचे वडील कॉन्सटन्ट आणि आई अल्फिना यांनी १९९०च्या काळात पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओने या देशातून अमेरिकेत स्थलांतर केले. अमेरिकेतील मेरीलँड राज्यात कॉन्सटन्ट यांनी कनिष्ठ गटातील टेनिसपटूंसाठी सराव केंद्र उभारण्यास मदत केली. या केंद्राच्या देखरेखीची जबाबदारीही त्यांच्यावर आली. इथेच टिआफोने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. टिआफोने नदालवर मात करत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यावर कॉन्सटन्ट आणि अल्फिना यांनी जल्लोष केला. त्यांच्याकडे पाहिल्यावर टिआफोलाही अश्रू अनावर झाले. आता उपांत्यपूर्व फेरीत टिआफोपुढे नवव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हचे आव्हान असेल.
रुब्लेव्हने सातव्या मानांकित ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीचा ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गतविजेता डॅनिल मेदवेदेव आणि नदाल हे स्पर्धेबाहेर झाल्याने आता जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अनुभवी मरीन चिलिचला ६-४, ३-६, ६-४, ४-६, ६-३ असे नमवले. १९ वर्षीय अल्कराझचा आता ११व्या मानांकित इटलीच्या यानिक सिन्नेरशी सामना होईल. सिन्नेरने इलया इव्हान्शकाला ६-१, ५-७, ६-२, ४-६, ६-३ असे पराभूत केले.
श्वीऑनटेक, सबालेंकाची आगेकूच
महिला एकेरीत अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक, पाचव्या मानांकित जेसिका पेगुला आणि सहाव्या मानांकित अरिना सबालेंकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोलंडच्या श्वीऑनटेकने जर्मनीच्या ज्युल नेइमेयरचा २-६, ६-४, ६-० असा पराभव केला. पेगुलाने दोन विम्बल्डन विजेत्या पेट्रा क्विटोव्हाला ६-३, ६-२ असे नमवले. पुढील फेरीत श्वीऑनटेक आणि पेगुला आमनेसामने येतील. सबालेंकाने अमेरिकेच्या डॅनिएले कॉलिन्सवर ३-६, ६-३, ६-२ अशी मात केली. तर कॅरोलिना प्लिस्कोव्हाने व्हिक्टोरिया अझरेंकाचा ७-५, ६-७ (५-७), ६-२ असा पराभव केला.