इंडियन प्रिमिअर लीगच्या सहाव्या सिझनसाठी होणाऱया खेळाडूंच्या लिलावामध्ये सर्वांचे लक्ष अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्क आणि रिकी पॉंटिंग यांच्याकडेच असेल. आयपीएलमधील नऊ संघांचे मालक या दोन खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठीच सर्वाधिक बोली लावतील, असा अंदाज आहे.
एकूण १०१ खेळाडूंसाठी उद्या (रविवार) येथे लिलाव होणार आहे. हा लिलाव केवळ येत्या एप्रिल-मेमध्ये होणाऱया आयपीएलच्या सामन्यांसाठी असेल. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कर्णधार मायकल क्लार्क आणि रिकी पॉटिंग यांच्यासाठी सर्वात जास्त म्हणजेच २.१ कोटी रुपयांची आधार किंमत ठरविण्यात आली आहे.
सध्या कर्णधाराच्या शोधात असलेला मुंबई इंडियन्सचा संघ क्लार्कला आपल्या चमूत आणण्याचा विचार करू शकतो. त्याचवेळी सहारा पुणे वॉरियर्सही क्लार्कला आपल्याकडे ओढण्यासाठी जास्तीत जास्त बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये क्लार्कने पुणे वॉरियर्सकडून सहा सामने खेळले होते. त्यातच पुणे वॉरियर्सचा आधारस्तंभ युवराजसिंगने केवळ आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले, तर क्लार्क त्या संघाला कर्णधार म्हणूनही उपयुक्त ठरू शकतो.
हैदराबाद सन रायजर्स संघाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा संघ रिकी पॉटिंगला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघाचा मार्गदर्शक आणि कर्णधार म्हणून त्याच्याकडेच बघितले जात आहे.