ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याला गुरूवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५७ धावा केल्या. मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २५० चा टप्पा पार केला. या सामन्यात मार्नस लाबूशेनच्या बाबतीत एक अत्यंत विचित्र घटना घडली. कॉलिन डी ग्रँडहोम याने टाकलेल्या चेंडूच्या उसळीचा अंदाज न आल्याने तो विचित्र पद्धतीने त्रिफळाचीत झाला.
कॉलिन डी ग्रँडहोमने ५० व्या षटकात लाबूशेनला गोलंदाजी केली. लाबूशेन खेळपट्टीवर स्थिरावला होता. १४८ चेंडूत तो ६३ चेंडूंवर खेळत होता. त्यावेळी ग्रँडहोमने टाकलेला चेंडू लाबूशेन सोडून देणार होता, पण चेंडू उसळला आणि त्याच्या कोपराला लागला. चेंडू कोपराला लागून थेट स्टंपवर आदळला आणि तो अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला.
**Elbowed on! #AUSvNZ pic.twitter.com/UaC515y2Ct
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2019
दरम्यान, प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकातच जो बर्न्सला त्रिफळाचीत केले. लाबूशेन आणि वॉर्नरने डाव सावरला. अर्धशतकाच्या समीप असताना वॉर्नर बाद झाला. त्याला वॅगनर ४१ धावांवर माघारी धाडले. स्मिथ आणि लाबूशेन यांनी डाव पुढे नेला. त्यांनी ८३ धावांची दमदार भागीदारी केली. पण त्यानंतर लाबूशेन त्रिफळाचीत झाला. मॅथ्यू वेडही (३८) लवकर बाद झाला. अखेर स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी दिवसअखेर पर्यंत डाव सावरला. स्मिथने नाबाद ७७ धावा केल्या.