ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये चीनचे आव्हान पेलवणारी ली ना या माजी विजेत्या खेळाडूला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत यंदा पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष गटात स्टानिस्लास वॉवरिन्क यालाही पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले. डेव्हिड फेरर व पेत्रा क्विटोवा या मानांकित खेळाडूंनी विजयी प्रारंभ केला.
या स्पर्धेत २०११ मध्ये सनसनाटी अजिंक्यपद मिळविणाऱ्या ली ना हिला येथे स्थानिक खेळाडू ख्रिस्तिना मॅलदेनोविक हिने ७-५, ३-६, ६-१ असे पराभूत केले. पाचवी मानांकित क्विटोवा या चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूने कझाकिस्तानच्या शरिना दियास हिला ७-५, ६-२ असे हरविले. चौथी मानांकित सिमोना हॅलेप हिने रशियाच्या अॅलिसा क्लेवीनोवा हिचे आव्हान ६-०, ६-२ असे संपुष्टात आणले.
ली ना हिने येथे २०११ मध्ये अजिंक्यपद मिळवीत चीनचे खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतात हे दाखवून दिले होते. तिने यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिच्याविषयी खूप अपेक्षा होती. पहिला सेट चिवट लढतीनंतर तिने गमावला. दुसऱ्या सेटमध्ये तिने सव्र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते. मात्र पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये तिला स्वत: च्या नावलौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. इस्रायलची अव्वल दर्जाची खेळाडू शहार पीर हिला पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावयास मिळाली. इगुनी बुचार्ड या कॅनडाच्या खेळाडूने तिला ६-०, ६-२ असे हरविले.
पाचवा मानांकित फेरर याने शानदार सलामी करताना नेदरलँडच्या इगोर सिझलिंग याच्यावर ६-४, ६-३, ६-१ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने सव्र्हिसवर चांगले नियंत्रण राखले होते. या स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांमधील खेळाडू वॉवरिन्क हा पहिल्याच फेरीत गारद झाला. स्पेनच्या गुर्लिमो गार्सिया लोपेझ याने त्याला ६-४, ५-७, ६-२, ६-० असे हरविले. वॉवरिन्क याला लोपेझच्या वेगवान खेळापुढे अपेक्षेइतका बचाव करता आला नाही.
अग्रमानांकित रॅफेल नदाल याने अमेरिकन खेळाडू रॉबर्ट गिनेप्री याचा ६-०, ६-३, ६-० असा धुव्वा उडविला. नदाल याने केलेल्या झंझावती खेळापुढे अमेरिकन खेळाडूला सूरच सापडला नाही. नदाल या गतविजेत्या खेळाडूने पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये आपल्या प्रतिस्पध्र्यास एकही सव्र्हिस जिंकण्यापासून वंचित ठेवले. त्याने नेटजवळूनही प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याने क्रोएशियाच्या इव्हो कालरेहिक याच्यावर ६-४, ७-५, ७-६ (७-४) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
Nigeria (f – group) FIFA World Cup 2014
2014 FIFA World Cup, Nigeria football team
नायजेरिया (फ-गट) : आफ्रिकन सफारी!
संकलन : तुषार वैती
या वर्षी आफ्रिकन देशांची फुटबॉल स्पर्धा जिंकल्यामुळे नायजेरिया संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार, मात्र आफ्रिकन देशांमध्ये दादा संघ समजल्या जाणाऱ्या नायजेरियन खेळाडूंसमोर समस्यांचा जणू डोंगरच उभा राहिला आहे. फुटबॉल म्हणजे सर्वाधिक पैसा मिळवून देणारा खेळ, पण प्रशिक्षक स्टीफन केशी यांचे खेळाडूंशी खटके उडू लागल्यामुळे नायजेरिया फुटबॉल असोसिएशनने केशी यांच्यासह काही खेळाडूंचे मानधनच रखडवले आहे. दोन वेळा बाद फेरीत मजल मारणाऱ्या नायजेरियाच्या कामगिरीवर या घडामोडीमुळे परिणाम होऊ शकतो.
आफ्रिकन देशांमधून पात्रता फेरीत नायजेरिया संघ फिफा विश्वचषकासाठी दावेदार समजला जात होता. नाजजेरियाने आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा सार्थ करत आयव्हरी कोस्ट, कॅमेरून, घाना आणि अल्जेरियासह ब्राझीलचे तिकीट मिळवले. मालावी, केनिया आणि नामिबिया या देशांच्या गटात समावेश असलेल्या नायजेरियाने गटफेरीत एकही सामना गमावला नाही. मात्र त्यांनी तिन्ही संघांविरुद्ध बरोबरी पत्करली. प्ले-ऑफ फेरीत त्यांनी इथिओपियाचे आव्हान मोडीत काढत फिफा विश्वचषकासाठी स्थान मिळवले.
१९९४ आणि १९९८ मध्ये पहिल्या दोन्ही प्रयत्नांत नायजेरियाने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र २०१० मध्ये नायजेरिया संघ धडपडत होता. अखेर २०१४ मध्ये पुन्हा विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवून देशातील फुटबॉलला नवी झळाळी देण्याची संधी नायजेरियाला मिळाली आहे. १९९४ मध्ये अर्जेटिना, बल्गेरिया, नायजेरिया आणि ग्रीस यांच्या गटात नायजेरियाने बल्गेरियावर ३-० आणि ग्रीसवर २-० असा विजय मिळवून बाद फेरी गाठली. पण एकापेक्षा आश्चर्यकारक निकाल देत नायजेरियाने पहिल्याच प्रयत्नात दमदार फुटबॉलचे प्रदर्शन केले होते. दुसऱ्या फेरीत नायजेरियाचा संघ इतिहास घडवण्याच्या मार्गावर होता. २५व्या मिनिटाला गोल करूनही अखेरच्या क्षणी इटलीने बरोबरी साधली. अखेर अतिरिक्त वेळेत इटलीने नायजेरियावर मात केली. १९९८ मध्ये नायजेरियाने बलाढय़ स्पेनवर ३-२ असा विजय मिळवत संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. बल्गेरियावर विजय आणि पॅराग्वेकडून हार पत्करल्यानंतर नायजेरियन सफारी दुसऱ्या फेरीपर्यंत गेली, पण डेन्मार्ककडून १-४ असे पराभूत व्हावे लागल्यामुळे नायजेरियाचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. २००६ मध्ये स्वीडन, अर्जेटिना आणि इंग्लंड या बलाढय़ संघांसमोर नायजेरियाची डाळ शिजू शकली नाही.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
प्रशिक्षक स्टीफन केशी यांनी निष्प्रभ स्टार खेळाडूंपेक्षा मेहनती युवा खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नायजेरियाला आफ्रिकन देशांची स्पर्धा जिंकता आली. युवा खेळाडू हीच नायजेरियाची भक्कम बाजू समजली जात आहे. रस्त्यांवर फुटबॉल खेळून आपल्या कारकिर्दीला झळाळी देणारा ऑगस्टिन आझुका नायजेरियासाठी हुकुमी एक्का ठरणार आहे. त्याची तांत्रिक शैली, पासिंगचे कौशल्य यामुळे तो चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. जॉन ओबी मिकेल या मधल्या फळीतील खेळाडूकडे पासिंगचे अद्भुत कौशल्य आहे. आक्रमणातही तो नायजेरियासाठी योग्य पर्याय असणार आहे.
अपेक्षित कामगिरी
अर्जेटिना, इराण तसेच बोस्निया आणि हेझ्रेगोविना या संघांसोबत नायजेरियाचा ‘फ’ गटात समावेश आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिना संघ बाकीच्या तिन्ही संघांवर वर्चस्व गाजवणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे अर्जेटिना संघ ‘फ’ गटात अव्वलस्थानी असणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी इराण आणि नायजेरिया या दोन संघांमध्येच खरी चुरस असणार आहे. बोस्निया आणि हेझ्रेगोविना हा संघ पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. इतक्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळताना बोस्निया आणि हेझ्रेगोविना संघावर चाहत्यांचे दडपण असणारच. पण ‘सरप्राइज पॅकेज’ असलेला नायजेरिया संघ बोस्निया आणि हेझ्रेगोविना संघावर मात करेल. त्यामुळे नायजेरिया वि. इराण यांच्यात होणाऱ्या सामन्याचा निकाल गटातील दुसरा संघ ठरवणार आहे. पण या सामन्यात नायजेरिया संघ चांगली कामगिरी करून दुसऱ्या फेरीत प्रवेश मारेल, असे फुटबॉलपंडितांचे म्हणणे आहे.
फिफा क्रमवारीतील स्थान : ४४
विश्वचषकातील कामगिरी
सहभाग : ४ वेळा (२०१४सह)
संभाव्य संघ
गोलरक्षक : विन्सेन्ट एनयेमा (कर्णधार), ऑस्टिन इजिडे, डॅनियल अकपेयी, चिगोझी अगबिम. बचावफळी : एल्डरसन इचिजिले, इफे अॅम्ब्रोस, गॉडफ्रे ओबोआबोना, अझुबुईके इग्वुकेवे, केनेथ ओमेरुओ, जुवोन ओशानिवा, जोसेफ योबो, कुनले ओडूनलामी. मधली फळी : जॉन मिकेल ओबी, रमोन अझीझ, ओगेनयी ओनाझी, जोएल ओबी, नामदी ओडुआमदी, इजिके युझोएन्यी, नोसा इगेबोर, संडे मबा, रुबेन गॅब्रियल, मायकेल बाबाटुन्डे. आघाडीवीर : अहमद मुसा, शोला अमेओबी, इमान्युएल इमेनिके, ओबिन्ना सोफोर, पीटर ओडेमविंगी, मायकेल उचेबो, विक्टर मोसेस, उचे वोफोर.
स्टार खेळाडू : जॉन मिकेल ओबी, शोला अमेओबी, विक्टर मोसेस.
व्यूहरचना : ४-३-३ किंवा ४-२-३-१
प्रशिक्षक : स्टीफन केशी