ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये चीनचे आव्हान पेलवणारी ली ना या माजी विजेत्या खेळाडूला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत यंदा पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष गटात स्टानिस्लास वॉवरिन्क यालाही पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले. डेव्हिड फेरर व पेत्रा क्विटोवा या मानांकित खेळाडूंनी विजयी प्रारंभ केला.
या स्पर्धेत २०११ मध्ये सनसनाटी अजिंक्यपद मिळविणाऱ्या ली ना हिला येथे स्थानिक खेळाडू ख्रिस्तिना मॅलदेनोविक हिने ७-५, ३-६, ६-१ असे पराभूत केले. पाचवी मानांकित क्विटोवा या चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूने कझाकिस्तानच्या शरिना दियास हिला ७-५, ६-२ असे हरविले. चौथी मानांकित सिमोना हॅलेप हिने रशियाच्या अॅलिसा क्लेवीनोवा हिचे आव्हान ६-०, ६-२ असे संपुष्टात आणले.
ली ना हिने येथे २०११ मध्ये अजिंक्यपद मिळवीत चीनचे खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतात हे दाखवून दिले होते. तिने यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिच्याविषयी खूप अपेक्षा होती. पहिला सेट चिवट लढतीनंतर तिने गमावला. दुसऱ्या सेटमध्ये तिने सव्र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते. मात्र पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये तिला स्वत: च्या नावलौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. इस्रायलची अव्वल दर्जाची खेळाडू शहार पीर हिला पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावयास मिळाली. इगुनी बुचार्ड या कॅनडाच्या खेळाडूने तिला ६-०, ६-२ असे हरविले.
पाचवा मानांकित फेरर याने शानदार सलामी करताना नेदरलँडच्या इगोर सिझलिंग याच्यावर ६-४, ६-३, ६-१ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने सव्र्हिसवर चांगले नियंत्रण राखले होते. या स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांमधील खेळाडू वॉवरिन्क हा पहिल्याच फेरीत गारद झाला. स्पेनच्या गुर्लिमो गार्सिया लोपेझ याने त्याला ६-४, ५-७, ६-२, ६-० असे हरविले. वॉवरिन्क याला लोपेझच्या वेगवान खेळापुढे अपेक्षेइतका बचाव करता आला नाही.
अग्रमानांकित रॅफेल नदाल याने अमेरिकन खेळाडू रॉबर्ट गिनेप्री याचा ६-०, ६-३, ६-० असा धुव्वा उडविला. नदाल याने केलेल्या झंझावती खेळापुढे अमेरिकन खेळाडूला सूरच सापडला नाही. नदाल या गतविजेत्या खेळाडूने पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये आपल्या प्रतिस्पध्र्यास एकही सव्र्हिस जिंकण्यापासून वंचित ठेवले. त्याने नेटजवळूनही प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याने क्रोएशियाच्या इव्हो कालरेहिक याच्यावर ६-४, ७-५, ७-६ (७-४) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा