सेरेना विल्यम्स व डेव्हिड फेरर यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत धडाकेबाज विजय नोंदवित आगेकूच कायम राखली. भारताच्या सानिया मिर्झा हिने महिलांच्या दुहेरीत तर लिएण्डर पेस याने मिश्र दुहेरीत अपराजित्व राखले. माजी विजेती व अग्रमानांकित सेरेना हिने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सी हिच्यावर ६-१, ६-३ अशी सहज मात केली. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला तर दुसऱ्या सेटमध्ये तिने एकदा सव्‍‌र्हिस ब्रेक घेतला. महिलांच्याच एकेरीत स्वेतलाना कुझनेट्सोव्हा या रशियन खेळाडूने आठव्या मानांकित अँजेलिक केर्बर हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला. तिने चुरशीची ही लढत ६-४, ४-६, ६-३ अशी जिंकली. तिने पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविताना क्रॉसकोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला.
पुरुष गटात, चौथ्या मानांकित डेव्हिड फेरर या स्पॅनिश खेळाडूने विजयी मालिका कायम राखली. त्याने झंझावाती खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसन याच्यावर ६-३, ६-१, ६-१ असा सफाईदार विजय मिळविला. त्याने या सामन्यात पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला.  
जो-विल्फ्रेड त्सोंगा याने विजयी घोडदौड कायम राखताना व्हिक्टर त्रिओकी याच्यावर सरळ तीन सेट्समध्ये मात केली. हा सामना त्याने ६-३, ६-३, ६-३ असा जिंकला. स्पेनच्या  टॉमी रॉब्रेडो याला विजयासाठी बराच घाम गाळावा लागला. आपल्याच देशाच्या निकोलस अल्माग्रो याने त्याला पाच सेटपर्यंत झुंजवले. अखेर रॉब्रेडोने हा सामना ६-७  (५/७), ३-६, ६-४, ६-४, ६-४ असा खिशात घातला.

सानिया-बेथानी, पेस दुसऱ्या फेरीत
पॅरिस : सानिया मिर्झा आणि तिची सहकारी बेथानी मट्टेक-सँड्स यांनी अलिझ कॉर्नेट आणि विर्जिनी रझ्झानो यांच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. सातव्या मानांकित सानिया-बेथानी जोडीने एक तास आणि २८ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात ६-३, ६-४ असा विजय मिळवला. सानिया-बेथानीला पुढील फेरीत अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिस आणि मेगान मॉल्टन-लेव्ही यांचा सामना करावा लागेल. मिश्र दुहेरीत लिएण्डर पेसने सर्बियाच्या येलेना यांकोव्हिच हिच्या साथीने आव्हान कायम राखले. त्यांनी गॅलिना व्होस्कोबोएव्हा  व डॅनिएला ब्रॅसीएली यांचा ७-५, ६-३ असा पराभव केला.