फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होते आहे. लाल मातीवरच्या रणसंग्रामात फ्रेंच अर्थात स्थानिक टेनिसपटूने जेतेपदाला गवसणी घालावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र दुखापती आणि खराब फॉर्म यामुळे यंदाही स्थानिक खेळाडू जेतेपदापासून दूरच राहण्याची शक्यता आहे.
१९८३ मध्ये यानिक नोहा यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्ष एकाही पुरुष फ्रेंच खेळाडूला ही किमया करता आलेली नाही. जो विलफ्रेड सोंगा, गेइल मॉनफिल्स, रिचर्ड गॅसक्वेट आणि गाइल्स सिमोन हे चार पुरुष फ्रेंच टेनिसपटू स्पर्धेत सहभाही होत आहेत. सिमोनला पाठदुखीने सतावले आहे. सोंगाची नव्या हंगामातली कामगिरी निराशाजनक आहे. मॉनफिल्सने डेव्हिस चषकात रॉजर फेडररला नमवण्याचा पराक्रम केला होता. मात्र त्यानंतर त्याला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. गॅस्क्वेटच्या बाबतीत दुखापती आणि खराब फॉर्म दोन्ही आघाडय़ांवर निराशाच आहे.
हे सर्व लक्षात घेता फ्रेंच चाहत्यांना यंदाही विदेशी खेळाडूच जेतेपदाचा चषक उंचावताना पाहावे लागेल असे चित्र आहे. महिलांमध्ये २००० साली मेरी पिअर्सने जेतेपदाची कमाई केली होती. मात्र त्यानंतर पंधरा वर्ष महिलांमध्येही एकाही फ्रेंच खेळाडूला जेतेपद पटकावता आलेले नाही.

Story img Loader