निशिकोरी, हालेप, स्टोसूर चौथ्या फेरीत; क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात
जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या अँडी मरेने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सरळ सेट्समध्ये विजयासह दिमाखात चौथी फेरी गाठली. सिमॉन हालेप, समंथा स्टोसूर आणि गार्बिन म्युग्युरुझाने यांनीही आपापल्या लढती जिंकत चौथ्या फेरीत वाटचाल केली. मात्र पेट्रा क्विटोव्हाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
द्वितीय मानांकित मरेला दुसऱ्या फेरीच्या लढतीत विजयासाठी पाचव्या सेटपर्यंत संघर्ष करावा लागला होता. मात्र या लढतीत झालेल्या चुकांतून बोध घेत मरेने शानदार विजय साकारला. मरेने इव्हो कालरेव्हिकला ६-१, ६-४, ७-६ असे नमवले. मॅथिअस बोर्ग आणि राडेक स्टेपानेक यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी मरेला ७ तास आणि १५ मिनिटे लढा द्यावा लागला होता. चौथ्या फेरीत मरेला जॉन इस्नर आणि तेयमुरेझ गाबाश्वहली यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. भेदक सव्र्हिससाठी प्रसिद्ध कालरेव्हिकविरुद्ध मरेने ५-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत मरेने पहिला सेट ६-१ असा जिंकला. ३७व्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेची तिसरी फेरी गाठणारा कालरेव्हिक जिमी कॉनर्सनंतरचा सगळ्यात वयस्कर खेळाडू ठरला. मरेच्या झंझावातासमोर कालरेव्हिक दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्येही निष्प्रभ ठरला.
मिलास राओनिकने आंद्रेज मार्टिनला ७-६, ६-२, ६-३ असे नमवले. रिचर्ड गॅस्क्वेटने निक कुर्यिगासवर ६-२, ७-६ (९-७), ६-२ असा विजय मिळवला. केई निशिकोरीने फर्नाडो व्हर्डास्कोचे आव्हान ६-३, ६-४, ३-६, २-६, ६-४ असे संपुष्टात आणले.
महिलांमध्ये सहाव्या मानांकित सिमोन हालेप पराभवाच्या उंबरठय़ावर होती. साखळी फेरीतच माघारी परतणाऱ्या मानांकित महिला खेळाडूंमध्ये सिमॉनचेही नाव दाखल होणार असे चित्र होते. मात्र सारा अनुभव पणाला लावत सिमोनने नओमी ओसाकावर ४-६, ६-२, ६-३ अशी मात केली. चौथ्या मानांकित म्युग्युरुझाने बेल्जियमच्या यानिना विकमेयरचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला. समंथा स्टोसूरने ल्युसी साफारोव्हाचा ६-३, ६-७, ७-५ असा पराभव केला. शेल्बी रॉजर्सने दहाव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाचे आव्हान ६-०, ६-७ (३-७), ६-० असे संपुष्टात आणले. द्वितीय मानांकित अॅग्निझेस्का रडवानस्काने बाबरेरा स्ट्रायकोव्हाला ६-२, ६-७ (६-८), ६-२ असे नमवले.
पेस, बोपण्णा दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत
लिएण्डर पेस व रोहन बोपण्णा यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह खेळताना पुरुष दुहेरची तिसरी फेरी गाठली आहे. सहाव्या मानांकित बोपण्णाने फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना ग्रिगोर बरिआ आणि क्वेंटिन हाल्स या फ्रेंच जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली. तसेच पेस आणि मासिन मॅटकोव्हस्की जोडीने ज्युलियन नोल आणि फ्लोरिअन मेयर जोडीवर ६-४, ६-३ असा विजय मिळवला.
दुखापतीमुळे नदालची माघार
‘लाल मातीचा बादशाह’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या राफेल नदालने मनगटाच्या दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र ही दुखापत म्हणजे कारकीर्दीचा शेवट नाही असे नदालने स्पष्ट केले. ‘‘मनगटाचे हाड मोडलेले नाही. मात्र मी स्पर्धेत खेळत राहिलो असतो तर दुखापत गंभीर झाली असती. स्पर्धेच्या अशा टप्प्यातून माघार घेणे निराशाजनक आहे. मात्र क्रीडापटूंना कारकीर्दीत अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. फ्रेंच स्पर्धेशी जिव्हाळ्याशी नाते असल्याने मी सुरुवातीच्या फेऱ्या खेळण्याचा धोका पत्करला. अन्य स्पर्धेत हे धाडस मी केले नसते,’’ असे भावुक झालेल्या नदालने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘नऊ वेळा मी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला आहे. माघार घेण्याचा क्षण कठोर आहे. पण हा निवृत्तीचा क्षण नाही.’’