पॅरिस : ब्राझीलच्या १४व्या मानांकित बीएट्रिझ हद्दाद माइआ आणि पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकने बुधवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
महिला एकेरी गटात हद्दाद माइआने सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली. तिने टय़ुनिशियाच्या सातव्या मानांकित आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ओन्स जाबेऊरवर ३-६, ७-६ (७-५), ६-१ असा विजय साकारला. या सामन्यात जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते, पण हद्दाद माइआने आपल्या आक्रमक खेळाने विजय साकारला. जाबेऊरने गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे हद्दाद माइआसाठी हा मोठा विजय आहे. सामन्यात हद्दाद माइआची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट तिने टायब्रेकरमध्ये जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये जाबेऊरला तिने पुनरागमनाची कोणतीही संधी न देता विजय साकारला. उपांत्य फेरीत हद्दाद माइआसमोर श्वीऑनटेकचे आव्हान असेल. उपांत्यपूर्व लढतीत श्वीऑनटेकने अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफवर ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत आगेकूच केली.
पुरुष एकेरीच्या सामन्यात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या अल्कराझने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला ६-२, ६-१, ७-६ (७-५) असे पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर २२ ग्रँडस्लॅम विजेत्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असेल. सामन्यातील पहिले दोन सेट अल्कराझने सहज जिंकत आपले मक्तेदारी सिद्ध केली. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासने त्याच्यासमोर आव्हान उपस्थित केले. एकवेळ अल्कराझने मजबूत आघाडी होती, पण त्सित्सिपासने सेट टायब्रेकपर्यंत खेचला. परंतु टायब्रेकरमध्ये अल्कराझने त्सित्सिपासला कोणतीच संधी न देता विजय साकारला.