एपी, पॅरिस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या डॅनिल मेदवेदेवला ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनाऊरकडून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात इटलीचा यानिक सिन्नेर व बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव यांनी आपापल्या सामन्यात विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात अरिना सबालेन्का व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनी विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.

मिनाऊरविरुद्धच्या सामन्यात पाचव्या मानांकित मेदवेदेव विजय मिळवेल असे दिसत होते. पहिला सेटही त्याने जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, मिनाऊरने यानंतर मेदवेदेवला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता ४-६, ६-२, ६-१, ६-३ असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यांमध्ये दुसऱ्या मानांकित सिन्नेरने फ्रान्सच्या कॉरेन्टिन मौटेटला २-६, ६-३, ६-२, ६-१ असे नमवले. तर, दिमित्रोवने पोलंडच्या हबर्ट हुरकाझला ७-६ (७-५), ६-४, ७-६ (७-३) अशा फरकाने पराभूत केले.

हेही वाचा >>> Sri Lanka vs South Africa : दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेवर सरशी; नॉर्किए, रबाडाचा प्रभावी मारा

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सबालेन्काने अमेरिकेच्या एमा नवारोवर ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सबालेन्काने नवारोला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. तर, चौथ्या मानांकित रायबाकिनाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-४, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. १२व्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीने एलिना अवानेस्यानचा ४-६, ६-०, ६-१ असा पराभव केला.

बोपण्णाएब्डेन जोडीची आगेकूच

भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन जोडीने पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात भारताचा एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल रेयास-वरेला जोडीवर ६-७ (२-७), ६-३, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा-एब्डेन जोडीने पुनरागमन करताना विजयाची नोंद केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French open 2024 alex de minaur beats daniil medvedev to march into quarter finals zws