पॅरिसमध्ये सुरु असलेल्या French Open Badminton स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने महिला एकेरीच्या गटात जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिला १०-२१, २१-१४, २१-१७ असे पराभूत केले.

लौकिकाला साजेसा खेळ करत पहिला गेम ओकुहाराने २१-१० असा जिंकला होता. त्यामुळे सायनाला सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील गेम जिंकणे आवश्यक होते. त्यावेळी सायनाने अनुभवाचा वापर करत अटीतटीचा गेम २१-१४ अशा फरकाने जिंकला. त्यामुळे तिसरा गेम हा निर्णायक होता. या गेममध्ये दोनही खेळाडूनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. पण अखेर सायनाने हा गेम २१-१७ असा जिंकून सामना खिशात घातला. सायनाचा पुढील सामना चिनी तैपईच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताय ज्यू यिंग हिच्याशी होणार आहे.

श्रीकांतनेही पुरुष एकेरीच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या डोंग कियुनचा १२-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. १ तास १३ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम श्रीकांतला २१-१२ असा गमवावा लागला. पण पुढील दोनही गेम आपल्या नवे करत त्याने आपली स्पर्धेतील आगेकूच सुरूच ठेवली. श्रीकांतची पुढची लढत माजी विश्वविजेता केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे.

Story img Loader