वृत्तसंस्था, पॅरिस
ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांना पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी तासाभराहून अधिक काळ शिकस्त करावी लागली.
सिंधूने तब्बल १ तास २० मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीनंतर कॅनडाच्या मिशेल लीचा २०-२२, २२-२०, २१-१९ असा पराभव केला. श्रीकांतने तैपेइच्या चोऊ टिएन चेनचे आव्हान २१-१५, २०-२२, २१-८ असे १ तास आणि ६ मिनिटांत संपुष्टात आणले.
हेही वाचा >>>R Ashwin 100th Test: विक्रमाधीश किमयागार रवीचंद्रन अश्विन
मिशेलविरुद्ध पहिल्या गेममध्ये ४-७ अशा पिछाडीनंतर सिंधूने ७-७ अशी बरोबरी साधली. मात्र, मिशेलने पुन्हा सलग चार गुण घेत ११-७ अशी आघाडी मिळवली. लगोलग सिंधूने चार गुण घेत बरोबरी साधली. त्यानंतर मात्र गेम बरोबरीतच राहिला. अखेरच्या टप्प्यात २०-२० अशा बरोबरीवर मिशेलने सलग दोन गुण घेत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ४-२ अशी सुरुवात केली. मात्र, नंतर मिशेलने गुणांचा सपाटा लावत १२-६ अशी मोठी आघाडी घेतली. सिंधूने मग आपल्या उंचीचा फायदा उठवत ताकदवान स्मॅशेसचा सुरेख वापर करत पाच गुण मिळवले आणि पिछाडी १४-१२ अशी भरून काढली. सिंधूने १८व्या गुणाला बरोबरी साधली आणि आपला चांगला खेळ सुरू ठेवत दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीच्या बरोबरीनंतर मध्याला ११-७ अशी आघाडी मिळवली होती. यानंतरही मिशेलने झुंज सोडली नाही आणि १३-१३ अशी बरोबरी साधली. ही बरोबरीची लढाई १८-१८ गुणांपर्यंत कायम राहिल्याने हा गेमही लांबण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र, सिंधूने पुढील चारपैकी तीन गुण घेत संघर्षपूर्ण विजय मिळवला.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर असणाऱ्या श्रीकांतची गाठ आता चीनच्या १७व्या स्थानावरील लु गुआंग झुशी पडणार आहे. लु याने भारताच्या एच. एस. प्रणॉयचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले.