नाजूक सौँदर्य, कमनीय बांधा, प्रत्येक स्पर्धेगणिक बदलणारे डिझायनर कपडे या गोष्टींसाठी प्रसिद्ध लावण्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने टेनिस विश्वातील सगळ्यात कठीण अशा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तीन तास चाललेल्या मॅरेथॉन अंतिम मुकाबल्यात रोमानियाच्या सिमोन हालेपवर ६-४, ६-७ (५-७), ६-४ असा विजय मिळवत शारापोव्हाने कारकिर्दीतील पाचव्या ग्रँडस्लॅम तर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्या जेतेपदाची नोंद केली. या विजयासह सर्वाधिक कमाई करणाऱ्या सार्वकालिन महिला टेनिसपटूंच्या मांदियाळीत शारापोव्हाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. २०१२ मध्ये याच स्पर्धेच्या जेतेपदासह शारापोव्हाने कारकिर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण केले होते. २००४ मध्ये सेरेना विल्यम्सवर सनसनाटी विजय मिळवत शारापोव्हाने जागतिक टेनिसमध्ये आपल्या आगमनाची नांदी केली होती. कारकिर्दीत दहा वर्षांनंतर अव्वल खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या शारापोव्हाने लाल मातीवरच्या जेतेपदासह महिला टेनिस विश्वातली हुकूमत सिद्ध केली आहे.
‘कारकिर्दीतील ही सगळ्यात कठीण ग्रँडस्लॅम लढत होती. २७व्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दोन जेतेपदे माझ्या नावावर आहेत यावर विश्वास बसत नाहीये’, असे शारापोव्हाने सांगितले.
पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाने अडखळत सुरुवात केली. सिमोनने घेतलेली आघाडी मोडून काढत शारापोव्हाने टक्कर दिली. प्रत्येक गुणासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. शारापोव्हाने ४-२ अशी आघाडी मिळवली मात्र चुकीच्या सव्‍‌र्हिसचा तिला फटका बसला. सिमोनने या चुकीचा फायदा घेतला मात्र तिच्याही हातून चुका घडल्या. शारापोव्हाने ही संधी न दवडता जवळपास तासभर रंगलेला पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये शारापोव्हाने २-० अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर सिमोनच्या अभ्यासपूर्ण खेळासमोर शारापोव्हाची पीछेहाट झाली. सव्‍‌र्हिस तसेच परतीच्या फटक्यांचा वेळी शारापोव्हाने मोठय़ा प्रमाणावर चुका केल्या. अनुनभवी सिमोनच्या खेळाचा फायदा उठवत शारापोव्हाने परतण्याचा प्रयत्न केला मात्र टायब्रेकरमध्ये गेलेल्या मुकाबल्यात सिमोनने सरशी साधली.
फ्रेंच खुल्या स्पर्धेत महिला गटाची अंतिम लढत तिसऱ्या सेटमध्ये जाण्याची २००१ नंतरची ही पहिली वेळ आहे. जेतेपदाच्या ईष्र्येने खेळणाऱ्या शारापोव्हाने अनुभव पणाला लावत ४-२ अशी दमदार आघाडी घेतली. मात्र कारकिर्दीत अल्पावधतीच जबरदस्त सुधारणा करत अंतिम फेरी गाठलेल्या सिमोनने टिच्चून खेळ करत ४-४ अशी बरोबरी केली. सेरेना विल्यम्स, लि ना आणि अ‍ॅग्निेझेस्का रडवान्सका या तीन अव्वल मानांकित खेळाडूंप्रमाणे शारापोव्हाला गाशा गुंडाळावा लागणार असे चित्र होते. मात्र मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत शारापोव्हाने झुंजार खेळ जेतेपदावर कब्जा केला.
६-४
६-७ (५-७)
६-४

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा