सेरेना विल्यम्सचा झंझावात रोखण्यासाठी सज्ज झालेल्या मारिया शारापोव्हाने दुखापत बाजूला सारून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. शारापोव्हासह व्हिक्टोरिया अझारेन्का, समंथा स्टोसूर, अँजेलिक्यू कर्बर, अलिझ कॉर्नेट यांनी विजयी आगेकूच केली. मात्र ११व्या मानांकित अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांमध्ये टॉमस बर्डीचने विजयासह दिमाखात सुरुवात केली.

द्वितीय मानांकित शारापोव्हाने इस्टोनिआच्या केईआ कनपेईवर ६-२, ६-४ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत तिचा मुकाबला रशियाच्याच व्हिटालिआ दिआतचेन्कोशी होणार आहे. २७ वर्षीय शारापोव्हाने दोन्ही सेट्समध्ये कनपेईवर वर्चस्व गाजवले. विजयासह शारापोव्हाने कनपेईविरुद्धची ५-० अशी निर्भेळ कामगिरी कायम राखली. सामना संपल्यानंतर स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने शारापोव्हाला मुलाखतीसाठी विचारणा केली. मात्र घशाच्या समस्येमुळे शारापोव्हाने मुलाखतीला नकार दिला. शारापोव्हाच्या नकारामुळे चाहत्यांनी तिची हुर्यो उडवली.
अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काला सलामीच्या लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. बिगरमानांकित बेकने ११व्या मानांकित रडवानस्कावर ६-२, ३-६, ६-१ अशी मात करत खळबळजनक विजय नोंदवला. बेकने अचूक सव्‍‌र्हिस आणि परतीच्या फटक्यांवर प्रभुत्व गाजवत बेकने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये रडवानस्काने लौकिकाला साजेसा खेळ करत बेकला निष्प्रभ केले. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये मात्र बेकने चिवटपणे खेळ करत सरशी साधली. समंथा स्टोसूरने मॅडिसन ब्रेन्गलवर ६-१, ६-३ असा विजय मिळवला. फ्रान्सच्या अ‍ॅलिझ कॉर्नेटने रॉबर्टा व्हिन्सीला ४-६, ६-४, ६-१ असे नमवले. गेल्या वर्षी दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू न शकलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काने मारिआ तेरेसा टोरो फ्लोरचा ६-२, ६-१ असा पराभव केला. अँजेलिक्यू कर्बरने तिमिआ बाबोसचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.
चौथ्या मानांकित टॉमस बर्डीचने पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या जपानच्या योशिहोटो निशिओकाला ६-०, ७-५, ६-३ असे नमवले. २०१०मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत बर्डीचने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. फॅबिओ फॉगनिनीने जपानच्याच तात्सुमा इटोचा ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला. ४२ वर्षांमध्ये जपानच्या पाच खेळाडूंनी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली होती. परंतु यापैकी बहुतांशी खेळाडूंना सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र यंदा पाचव्या मानांकित केई निशिकोरीने विजयी सलामी दिली आहे.

Story img Loader