गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच याला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीत शुक्रवारी लाल मातीचा सम्राट असलेला राफेल नदाल याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अन्य लढतीत डेव्हिड फेरर याला अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी जो विल्फ्रेड त्सोंगा याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित करावी लागणार आहे.
नदाल या डावखुऱ्या स्पॅनिश खेळाडूने या स्पर्धेत आतापर्यंत सात वेळा विजेतेपद मिळविले आहे. आठव्या विजेतेपदासाठी तो उत्सुक झाला असून त्याकरिता त्याला जोकोवीच याच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. क्ले कोर्टवर नदाल याला तीन वेळा पराभूत करण्याची किमया केवळ जोकोव्हिच याने केली आहे. त्यामुळेच उपांत्य लढतीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्सोंगा याने स्पर्धेतील माजी विजेता व बलाढय़ खेळाडू रॉजर फेडरर याला उपांत्यपूर्व फेरीत केवळ तीन सेट्समध्ये नमविले होते. त्यामुळेच डेव्हिड फेरर या चौथ्या मानांकित खेळाडूला त्सोंगाविरुद्ध अव्वल दर्जाचा खेळ करावा लागणार आहे.