राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच कुठल्याही स्पर्धेत, कोणत्याही टप्प्यावर आमनेसामने आले की मुकाबला कट्टर होतो. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम लढतीच्या निमित्ताने टेनिस विश्वातले हे मातब्बर योद्धे ४२व्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांनाही स्वप्न खुणावत आहेत. तब्बल नवव्यांदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद नावावर करण्यासाठी नदाल उत्सुक आहे. या स्पर्धेत नदालने ६५ लढती जिंकल्या आहेत आणि केवळ एकामध्ये त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जेतेपदासह हा विक्रम बळकट करण्यासाठी नदाल तय्यार आहे. दुसरीकडे हार्ड आणि ग्रास कोर्टवर होणाऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद काबीज करणाऱ्या जोकोव्हिचला क्ले कोर्टवरचे जेतेपद अद्यापही पटकावता आलेले नाही. नदालसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला नमवत कारकिर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी जोकोव्हिच आसुसलेला आहे. नदालने जेतेपदाची कमाई केल्यास फ्रेंच खुल्या स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. दुसरीकडे चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असण्याची किमया साधणारा आठवा खेळाडू होण्याची दुर्मिळ संधी जोकोव्हिचकडे आहे.
यंदाच्या हंगामातील कामगिरीने जोकोव्हिचचे पारडे जड झाले आहे. नदालविरुद्धच्या शेवटच्या चारही लढतीत जोकोव्हिचने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे क्ले कोर्टवर झालेल्या रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतही जोकोव्हिचने नदालवर मात केली होती. मात्र ज्या पद्धतीने नदालने उपांत्य फेरीत अँडी मरेसारख्या अव्वल खेळाडूचा धुव्वा उडवला, ते पाहता जोकोव्हिचला बेसावध राहून चालणार नाही.
‘या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणे जोकोव्हिचसाठी नवीन नाही. जेतेपद पटकावण्यासाठीची प्रेरणेसह त्याने दिमाखदार कामगिरी केली आहे. मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे दडपण त्याच्यावर आहे’, असे नदालने सांगितले.

Story img Loader