रॉजर फेडररला नमवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने उपांत्य फेरीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. कारकीर्दीत दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून वॉवरिन्का केवळ एक पाऊल दूर आहे. अंतिम फेरीत त्याचा मुकाबला नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
तब्बल ३२ वर्षांच्या कालावधीनंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीत भूमीपुत्राला इतिहास घडवण्याची संधी होती. मात्र वॉवरिन्काने सोंगावर ६-३, ६-७ (१-७), ७-६ (७-३), ६-४ असा विजय मिळवत फ्रान्सवासियांच्या आशा संपुष्टात आणल्या. २०१४ मध्ये वॉवरिन्काने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची वॉवरिन्काची ही पहिलीच वेळ आहे.
पहिल्या सेटच्या चौथ्या गेममध्ये वॉवरिन्काने सोंगाची सव्‍‌र्हिस भेदली. या बळावरच वॉवरिन्काने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही वॉवरिन्काने चांगली सुरुवात केली. मात्र वॉवरिन्काच्या हातून दुहेरी चुका झाल्या. पाच ब्रेक पॉइंट्सचा उपयोग करून घेण्यात वॉवरिन्काला अपयश आले. याचा फायदा उठवत सोंगाने टायब्रेकरमध्ये सेट जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी होती. टायब्रेकरमध्ये सलग चार गुणांची कमाई करत वॉवरिन्काने आघाडी मिळवली. प्रचंड उष्णतेमुळे सोंगाच्या खेळातली लय हरपली. चौथ्या सेटमध्ये सोंगाची सव्‍‌र्हिस भेदत वॉवरिन्काने ५-२ अशी आघाडी घेतली. या आघाडीचा फायदा उठवत मॅचपॉइंटसह वॉवरिन्काने अंतिम फेरी गाठली.
‘‘हा अवघड सामना होता. प्रचंड उष्णतेमुळे शारीरिकदृष्टय़ा व सोंगासारख्या तुल्यबळ खेळाडूमुळे मानसिकदृष्टय़ा थकवणारी लढत होती. सामन्याचे पारडे कोणत्याही दिशेने झुकू शकले असते. सर्वोत्तम खेळामुळेच विजय झाला,’’ असे वॉवरिन्का म्हणाला.

ल्युसीसमोर सेरेनाचे आव्हान
बहुतांशी मानांकित खेळाडूंना गाशा गुंडाळावा लागल्याने महिला एकेरीत एकतर्फी लढती झाल्या. मारिया शारापोव्हा आणि अ‍ॅना इव्हानोव्हिक यांना नमवण्याची किमया करणाऱ्या चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी साफारोव्हाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जेतेपद तिला खुणावते आहे, मात्र त्यासाठी तिच्यासमोर बलाढय़ सेरेनाला चीतपट करण्याचे आव्हान आहे. साफारोव्हाने सेरेनाविरुद्ध झालेल्या आठही लढती गमावल्या आहेत. फ्रेंच खुल्या स्पर्धेचे तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना आतूर आहे. मात्र प्रचंड उष्ण वातावरण आणि दुखापती यांना टक्कर देत जेतेपद पटकावणे सेरेनासाठीही आव्हानात्मक आहे.

Story img Loader