अग्रमानांकित खेळाडू रॅफेल नदाल याने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याच्याचबरोबर पाचवा मानांकित डेव्हिड फेरर यानेही विजयी वाटचाल कायम राखली.
नदाल याने सर्बियाच्या दुसान लाजोव्हिक याच्यावर ६-१, ६-२, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. त्याचाच सहकारी फेरर याने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याचे आव्हान ६-३, ६-३, ६-७ (४-७), ६-१ असे संपुष्टात आणले. महिलांच्या गटात जर्मनीची आंद्रेया पेटकोविक हिने अपराजित्व राखताना नेदरलँड्सच्या किकी बर्टन्स हिचा १-६, ६-२, ७-५ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.
या स्पर्धेत आतापर्यंत आठ वेळा अजिंक्यपद मिळविणारा नदाल याच्या वेगवान खेळापुढे दुसान याचा बचाव सपशेल निष्प्रभ ठरला. नदालने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने बेसलाइनवरून व्हॉलीजचाही सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्येही नदालच्या झंझावती खेळापुढे दुसान याला फारसे कौशल्य दाखविता आले नाही. तिसऱ्या सेटमध्येही नदाल याच्या चतुरस्र खेळापुढे दुसान याचा खेळ फिका ठरला.
नदालच्या तुलनेत फेरर याला थोडेसे झुंजावे लागले. त्याने केविनविरुद्ध पहिले दोन सेट घेतले. या दोन्ही सेट्समध्ये त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तिसऱ्या सेटमध्ये फेरर याच्या खेळात शिथिलता आली. त्याचा फायदा घेत केविन याने हा सेट टायब्रेकपर्यंत नेला. तेथे त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला व या ब्रेकच्या आधारे त्याने टायब्रेकर मिळवित सेट घेतला. हा सेट गमावल्यानंतर फेरर याने पुन्हा खेळावर नियंत्रण मिळविले. त्याने चौथ्या सेटमध्ये वेगवान खेळ करीत दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. त्याचा फायदा घेत त्याने हा सेट मिळवीत सामनाही जिंकला.
महिलांमध्ये आंद्रेया हिला बर्टन्सविरुद्ध पहिल्या सेटमध्ये अपेक्षेइतका सूर सापडला नाही. तिने दोन वेळा सव्‍‌र्हिस गमावली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिला सूर सापडला. तिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत हा सेट घेतला. त्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आव्हान टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आंद्रेयाने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवीत हा सेट घेतला व सामनाही जिंकला.

Story img Loader