रोलँड गॅरोसवर जिंकून जिंकून जिंकणार कोण.., याचे उत्तर कोणीही सहजपणे देईल.. लाल मातीचा अद्वैत सम्राट.. एकमेवाद्वितीय.. जणू त्याचे हे संस्थानच.. फ्रान्सच्या लाल मीतीशी नेमके त्याचे काय नाते कुणास ठाऊक, पण या मातीमध्ये पाय रोवल्यावर त्याच्या ललाटी विजयाचा लाल टिळा हमखास लागतो.. या लाल मातीतील आतापर्यंतच्या ६७ सामन्यांमध्ये त्याने ६६ सामने जिंकले आहेत.. त्याचे हे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतले सलग पाचवे आणि एकंदरीत नववे जेतेपद.. त्यामुळे या लाल मातीत कुणीही समोर येवो हुकूमत फक्त नदालशाहीचीच.. फ्रेंच खुल्या स्पर्धेतील लाल मातीशी असलेले नाते अधिक घट्ट करत जिद्दी, मेहनती, वीजीगिषू वृत्तीच्या अव्वल मानांकित राफेल नदालने अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोव्हिचवर ३-६, ७-५, ६-२, ६-४ अशी मात करत जेतेपदाची कमाई केली. २७ वर्षीय नदालच्या कारकिर्दीतले हे १४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या जेतेपदासह पीट सॅम्प्रसच्या १४ जेतेपदांच्या विक्रमाशी नदालने बरोबरी केली आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या रॉजर फेडररच्या १७ जेतेपदांच्या विक्रमापासून नदाल आता केवळ तीन जेतेपदे दूर आहे.
अंतिम लढतीत जेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे नोव्हाक जोकोव्हिचचे कारकिर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. कारकिर्दीतील २०व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळणाऱ्या नदालने पहिला सेट गमावल्यानंतरही जिद्दीने खेळ करत जोकोव्हिचला निष्प्रभ केले. ३ तास आणि ३१ मिनिटे चाललेल्या मुकाबल्यात, जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. जोकोव्हिचची सव्र्हिस भेदत परतण्याची संधी नदालने वाया घालवली. एकाग्रता आणि लय दोन्ही हरवलेल्या नदालने पहिला सेट गमावला. २००५ नंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सेट गमावण्याची नदालची ही पहिलीच वेळ ठरली. विजीगिषु वृत्तीचे जिवंत प्रतीक असलेल्या नदालने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर दुसऱ्या सेटमध्ये सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये २२ फटक्यांच्या रॅलीद्वारे नदालने २-० अशी आघाडी मिळवली. तळपत्या उन्हात त्वेषाने खेळ करत नदालने पाच गुणांची कमाई केली. सर्व फटक्यांवरचे अद्भुत वर्चस्व आणि जबरदस्त शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर नदालने तिसरा सेट नावावर केला. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचचा खेळ आणि प्रकृती दोन्ही खालावली. नदालने ४-३ अशी आघाडी घेतली. मात्र लाल मातीवरच्या जेतेपदासाठी आतुर जोकोव्हिचने नदालची सव्र्हिस भेदत ४-४ बरोबरी साधली. मात्र यानंतर ५-४ अशी आगेकूच केली. जोकोव्हिचच्या हातून झालेल्या तिसऱ्या दुहेरी चुकीच्या फटक्यासह नदालने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
*अन्य ग्रँडस्लॅम जेतेपदे
ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा- २००८
विम्बल्डन- २००८, २०१०
अमेरिकन खुली स्पर्धा- २०१०, २०१३