गतविजेत्या मारिया शारापोव्हाने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र पुरुषांमध्ये अव्वल मानांकित टॉमस बर्डीच आणि राडेक स्टेपानेक यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्यावर्षी या स्पर्धेचे जेतेपद पटकावत शारापोव्हाने कारकीर्दीतील ग्रँडस्लॅम विजयाचे वर्तुळ पूर्ण केले. सलामीच्या लढतीत शारापोव्हाने तैवानच्या सेइह सु-वेईचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. केवळ आठ गुण गमावत हा विजय साकारला. दुसऱ्या फेरीत शारापोव्हाची लढत कॅनडाच्या युवा इयुजेनी बोचार्डशी होणार आहे. शानदार सव्‍‌र्हिसवर भर देत तसेच टाळता येण्याजोगा चुका कमी करत शारापोव्हाने सहजपणे विजय मिळवला. दरम्यान सेहह सु-वेईसाठी फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळण्याची पाचवी वेळ मात्र पाचही वेळा पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला आहे.
या स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड मिळालेल्या फ्रान्सच्या गेइल मॉनफिल्सने पाचव्या मानांकित टॉमस बर्डीचला पराभवाचा धक्का दिला. घरच्या प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंब्यात मॉनफिल्सने बर्डीचवर ७-६, ६-४, ६-७, ६-७, ७-५ असा विजय मिळवला.
चार तासांच्या संघर्षपूर्ण लढतीनंतर मॉनफिल्सने हा विजय साकारला. अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या माद्रिद टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचवर मात करत बर्डीचने अंतिम चारमध्ये धडक मारली होती. फ्रेंच खुल्या स्पर्धेतही उपांत्य फेरीपर्यंत बर्डीच आगेकूच करणार असा चाहत्यांना विश्वास होता. मात्र मॉनफिल्सने बर्डीचला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळायला लावला. मी प्रचंड मेहनत घेतली, स्वत:वर विश्वास ठेवला आणि म्हणूनच हा विजय मिळवू शकल्याचे मॉनफिल्सने सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या निक क्यारिगोसने चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकला पराभूत करत सनसनाटी विजयाची नोंद केली. वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या १८ वर्षीय क्यारिगोसने स्टेपानेकवर ७-६ (७-४), ७-६ (१०-८), ७-६ (१३-११) असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत क्यारिगोससमोर क्रोएशियाच्या मारिन चिलीचचे आव्हान असणार आहे.
सोमदेवचा मुकाबला फेडररशी
पॅरिस : रॉजर फेडरर या नावाचा महिमा प्रचंड आहे. टेनिसविश्वातील सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीत फेडररचा समावेश होतो. स्पर्धा, जेतेपदे हे शब्द एकमेकांना समानार्थी वाटावेत अशा अद्भुत पद्धतीने जेतेपदांची कमाई करणारा फेडरर टेनिसचे विद्यापीठ आहे. वयाच्या तिशीत असणारा फेडरर कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे, मात्र तरीही त्याच्या खेळातील नजाकत, कलात्मकता तसूभरही कमी झालेली नाही. भारताच्या सोमदेव देववर्मनने स्पेनच्या डॅनियल मुनोझ डि ला नाव्हावर मात करत दिमाखात फ्रेंच खुल्या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आणि दुसऱ्याच फेरीत त्याच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे ते रॉजर फेडररचे. या महान खेळाडूविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा सोमदेवचा प्रयत्न असणार आहे. मात्र दुसऱ्याच फेरीत फेडररसारखा अव्वल खेळाडू वाटेत उभा राहिल्याने पुढच्या फेरीत आगेकूच करण्याच्या सोमदेवच्या आशा मावळल्या आहेत. फेडरर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या, तर सोमदेव १८८व्या स्थानी आहे. फेडररने सलामीच्या सामन्यात स्पेनच्या पाब्लो कॅरोनो-बुस्ताला ६-२, ६-२, ६-३ असे सहज नमवत दुसरी फेरी गाठली आहे. फेडररविरुद्ध खेळण्याचे सोमदेवचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे, मात्र त्याच्याविरुद्ध विजयासाठी सोमदेवला अफलातून खेळ करावा लागेल.

Story img Loader