सात ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या व्हीनस विल्यम्सला फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या सलामीच्या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी तब्बल १२ वर्षांआधी २००१ मध्ये व्हीनसला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. पोलंडच्या उर्झुला रडवानस्काने व्हीनसचे ६-७, ७-६, ६-४ असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली.
‘लाल मातीचा बादशाह’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या राफेल नदालला फ्रेंच खुल्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच विजयासाठी संघर्ष करावा लागला. नुकत्याच झालेल्या रोम स्पर्धेचे जेतेपद कमावणारा नदाल यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या विक्रमी आठव्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. पहिल्या फेरीचा अडथळा तो सहज पार करेल असे चित्र होते. मात्र जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्सने नदालला विजयासाठी झगडायला लावले. ब्रँड्सने पहिला सेट नावावर करत शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर नदालने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पुढचे तिन्ही सेट जिंकत सामना जिंकला. नदालने ब्रँण्ड्सला ४-६, ७-६ (७-५), ६-४, ६-३ असे नमवले. अन्य लढतींत केई निशिकोराने कॅनडाच्या जेसी लोव्हिन याच्यावर ६-३, ६-२, ६-० असा सहज विजय नोंदविला. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ करीत हा सामना जिंकला. जो विल्फ्रेड त्सोंगाने स्लोव्हाकियाच्या एलियाझ बेदेनी याला ६-२, ६-२, ६-३ असे सहज पराभूत केले.
महिलांमध्ये लि ना, कॅरोलिन वोझ्नियाकीने विजयी सलामी दिली. लि नाने अॅनाबेल मेदिनाचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच व्हॉलीजचाही बहारदार खेळ केला. अव्वल मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने इंग्लंडच्या लॉरा रॉब्सनचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा