फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीतील लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्ध विजय मिळवताना तिला झगडावे लागले. अॅना इव्हानोविक व एलिना स्वितोलिना यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाची खेळाडू सेरेना हिला अझारेन्का हिने कौतुकास्पद लढत दिली. अटीतटीने झालेला हा सामना सेरेना हिने ३-६, ६-४, ६-२ असा जिंकून चौथी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये सेरेना हिला सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. तथापि दुसऱ्या सेटमध्ये तिला सूर गवसला. तिने खेळावर नियंत्रण ठेवताना चतुरस्र खेळाचा
प्रत्यय घडविला व विजयश्री खेचून आणली.
सातव्या मानांकित इव्हानोविक हिने रशियाची खेळाडू एकतेरिना माकारोवा हिचा ७-५, ३-६, ६-१ असा पराभव केला. सर्बियन खेळाडू इव्हानोविक हिने सव्र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते. तिने बेसलाइन व्हॉलीजचाही सुरेख खेळ केला. युक्रेनच्या स्वितोलिना हिला स्थानिक खेळाडू अॅलिझ कॉर्नेट हिने दुसऱ्या सेटमध्ये चिवट लढत दिली. तथापि स्वितोलिना हिने सव्र्हिस व फोरहँडचे फटके यावर नियंत्रण ठेवीत हा सामना ६-२, ७-६ (११-९) असा जिंकला.
पुरुषांच्या दुहेरीत अमेरिकेच्या बॉब व माइक ब्रायन या बंधुंनी अपराजित्व राखले. अग्रमानांकित ब्रायन बंधुंनी जेरेमी चार्डी (फ्रान्स) व लुकाझ क्युबोट (पोलंड) यांच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2015 रोजी प्रकाशित
सेरेनाचा संघर्षमय विजय
फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीतील लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्ध विजय मिळवताना तिला झगडावे लागले.

First published on: 01-06-2015 at 01:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French open serena williams beats victoria azarenka