वय वर्षे ३३.. विविध दुखापतींनी शरीराला वेढा दिलेला.. मात्र जिंकण्याची उर्मी जिवंत असेल तर यशोशिखरही पादाक्रांत होऊ शकते, याचा प्रत्यय सेरेना विल्यम्सने दिला.. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ल्युसी साफारोव्हावर मात करत सेरेनाने कारकीर्दीतील २०व्या तर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या जेतेपदाची कमाई केली.

k02संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावत अंतिम फेरीत धडक मारणारी ल्युसी सेरेनाला चीतपट करत चमत्कार घडवणार का, अशा चर्चा सामना सुरू होईपर्यंत रंगल्या होत्या. अंतिम लढतीपर्यंतच्या वाटचालीत मारिया शारापोव्हा आणि अ‍ॅना इव्हानोव्हिकला नमवणाऱ्या ल्युसीने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण न घेता सेरेनाला टक्कर दिली. मात्र व्यावसायिकतेचा नमुना सिद्ध करत सेरेनाने ही लढत ६-३, ६-७ (२-७), ६-२ अशी जिंकली.

अविरत मेहनत आणि गुणवत्तेची साथ असूनही अनेक महिला खेळाडूंना कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरता येत नाही. दुसरीकडे उपजत प्रतिभेला अथक मेहनतीची जोड देत, दुखापतींचे काटेकोर व्यवस्थापन केल्याने सेरेनाचा विजयरथ तिशीनंतरही वेगाने दौडतो आहे.

या जेतेपदासह सेरेना सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद विजेत्या महिला खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या सेटमध्ये नेहमीच्या झंझावाती पद्धतीने खेळत सेरेनाने ४-२ अशी भक्कम आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावरच सेरेनाने अवघ्या अर्धा तासात पहिला सेट नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्ये तिच्या खेळातली एकाग्रता हरवली. स्वैर सव्‍‌र्हिस, परतीचे फटके खेळताना झालेल्या चुका याचा फायदा उठवत साफारोव्हाने आगेकूच केली. मात्र सेरेनाने ४-४ अशी बरोबरी केली. मात्र त्यानंतर साफारोव्हाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना दुसरा सेट जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही ल्युसीने २-० अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर सेरेनाने सलग सहा गुणांची कमाई केली. या आघाडीच्या आधारे सेरेनाने तिसऱ्या सेटसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मी कच खाल्ली होती. मला हे मान्य करावेच लागेल. ल्युसीने आक्रमक खेळ केला. कारकीर्दीतील सगळ्यात नाटय़मय ग्रँड स्लॅम विजय. तापामुळे मी सरावही केला नव्हता. ल्युसीने शानदार खेळ करत टक्कर दिली. मी विचार करायचे सोडून खेळावर लक्ष केंद्रित केले आणि विजय साकारला. चाहत्यांनी जबरदस्त पाठिंबा देत माझा हुरूप वाढवला. विसावे ग्रँडस्लॅम पटकावणे अद्भूत आहे. – सेरेना विल्यम्स

सेरेना एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे- २०

’१९९९- अमेरिकन खुली स्पर्धा वि. मार्टिना हिंगिस, ६-३, ७-६ (७-४)

’२००२- फ्रेंच खुली स्पर्धा वि. व्हीनस विल्यम्स, ७-५, ६-३

’२००२- विम्बल्डन वि. व्हीनस विल्यम्स ७-६ (७-४), ६-३

’२००२- अमेरिकन खुली स्पर्धा वि. व्हीनस विल्यम्स, ६-४, ६-३

’२००३- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. व्हीनस विल्यम्स, ७-६ (७-४), ३-६, ६-४

’२००३- विम्बल्डन वि. व्हीनस विल्यमस ४-६, ६-४, ६-२

’२००५- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. लिंडसे डेव्हनपोर्ट २-६, ६-३, ६-०

’२००७- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. मारिया शारापोव्हा ६-१, ६-२

’२००८- अमेरिकन खुली स्पर्धा वि. जेलेना जॅन्कोव्हिक ६-४, ७-५

’२००९- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. दिनारा सफीना ६-०, ६-३

’२००९- विम्बल्डन वि. व्हीनस विल्यम्स ७-६ (७-३), ६-२

’२०१०- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. जस्टीन हेनिन हार्डेन ६-४, ३-६, ६-२

’२०१०- विम्बल्डन वि. व्हेरा व्होनारोव्हा ६-३, ६-२

’२०१२- विम्बल्डन वि. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का ६-१, ५-७, ६-२

’२०१२- अमेरिकन खुली स्पर्धा वि. व्हिक्टोरिया अझारेन्का ६-२, २-६, ७-५

’२०१३- फ्रेंच खुली स्पर्धा वि. मारिया शारापोव्हा ६-४, ६-४

’२०१३- अमेरिकन खुली स्पर्धा वि. व्हिक्टोरिया अझारेन्का ७-५, ६-७ (६-८), ६-१

’२०१४- अमेरिकन खुली स्पर्धा वि. कॅरोलिन वोझ्नियाकी ६-३, ६-३

’२०१५- ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा वि. मारिया शारापोव्हा ६-३, ७-६ (७-५)

’२०१५- फ्रेंच खुली स्पर्धा वि. ल्युसी साफारोव्हा ६-३, ६-७ (२-७), ६-२

Story img Loader