ग्रँड स्लॅम स्पर्धापैकी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेचा लाल मातीवरचा थरार आजपासून रंगणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला राफेल नदाल आपल्या बालेकिल्ल्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयार आहे. नदालच्या नावावर फ्रेंच खुल्या स्पर्धेची सहा जेतेपदे आहेत. सातवे विक्रमी जेतेपद कमावण्यासाठी नदालसमोर नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर या दोघांचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत असणाऱ्या जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी जोकोव्हिचने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र नदालच्या झंझावातापुढे त्याचा टिकाव लागला नाही. या पराभवाची परतफेड करण्याचा जोकोव्हिचचा प्रयत्न असेल. रॉजर फेडररचे वय बघता, ही त्याची शेवटची फ्रेंच खुली स्पर्धा असू शकते. त्या पाश्र्वभूमीवर शेवट गोड करण्यासाठी फेडरर आतूर असणार आहे.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्स जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. मारिया शारापोव्हा, व्हिक्टोरिया अझारेन्का, लि ना, अ‍ॅग्निेझेस्का रडवान्सका, पेट्रा क्विटोव्हा यांच्यासमोर सेरेनाला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचे जेतेपद कमावत शारापोव्हाने कारकीर्दीतील ग्रँड स्लॅम विजयाचे वर्तुळ पूर्ण केले. मात्र विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. भारतासाठी महेश भूपती-रोहन बोपण्णा तर लिएण्डर पेस ऑस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्झरच्या साथीने सहभागी होत आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झा अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँण्ड्सच्या साथीने आपले नशीब अजमावणार आहे.

Story img Loader