एपी, पॅरिस : विश्वातील अव्वल महिला टेनिसपटू इगा श्वीऑनटेक आणि १८ वर्षीय कोको गॉफ यांनी गुरुवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांमध्ये मारिन चिलिच आणि कॅस्पर रूड यांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. गुरुवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या १८व्या मानांकित गॉफने इटलीच्या बिगरमानांकित मार्टिना ट्रेव्हिसानला ६-३, ६-१ असे एक तास, २८ मिनिटे चाललेल्या लढतीत पराभूत केले. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच गॉफने आक्रमक शैलीत खेळ करत ट्रेव्हिसानवर वर्चस्व प्रस्थापित केले आणि तिला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. त्यापूर्वी, पोलंडच्या श्वीऑनटेकने २०व्या मानांकित डारिआ कसात्किनाला ६-२, ६-१ असे नमवले. या सामन्यात २१ वर्षीय श्वीऑनटेकने दर्जेदार कामगिरी करताना कसात्किनाची सव्र्हिस पाच वेळा मोडली. त्यामुळे २०२० नंतर पहिल्यांदा तिने फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या माजी ग्रँडस्लॅम विजेत्या चिलिचने सातव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हला चार तास आणि १० मिनिटे चाललेल्या लढतीत ५-७, ६-३, ६-४, ३-६, ७-६ (१०-२) असे पराभूत केले आणि पहिल्यांदा फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले. शुक्रवारी उपांत्य फेरीत २०व्या मानांकित चिलिचचा सामना रूडशी होणार आहे. रूडने डेन्मार्कच्या १९ वर्षीय होल्गर रूनचा ६-१, ४-६, ७-६ (७-२), ६-३ असा पराभव केला.
बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा नेदरलँड्सचा साथीदार मॅटवे मिडलकूपला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. एल साल्वाडोरचा मार्सेलो अरेव्हालो आणि नेदरलँड्सचा जीन-ज्युलियन रॉजर या जोडीने गुरुवारी १६व्या मानांकित बोपण्णा आणि मिडेलकूप जोडीला ४-६, ६-३, ७-६ (१०-८) अशा फरकाने नमवले. लिअँडर पेसने २०१३च्या अमेरिकन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. तसेच बोपण्णाला २०१० नंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीचा टप्पा गाठता आलेला नाही.