झ्वेरेव्ह, रुड पुढच्या फेरीत; महिलामध्ये गॉफ, जाबेउरचे विजय
वृत्तसंस्था, पॅरिस
स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने पहिल्या फेरीत विजय मिळवत फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. यासह नॉर्वेच्या चौथ्या मानांकित कॅस्पर रुड व अमेरिकेच्या टॉमी पॉल यांनी आगेकूच केली, तर महिलांमध्ये अमेरिकेची सहाव्या मानांकित कोको गॉफ व सातव्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरने पुढची फेरी गाठली.
अल्कराझने इटलीच्या फ्लॅविओ कोबोलीला ६-०, ६-२, ७-५ अशा फरकाने पराभूत केले. सामन्यातील पहिल्या दोन सेटमध्ये अल्कराझने कोबोलीला पुनरागमनाची संधी दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये कोबोलीने प्रतिकार केला. मात्र, अल्कराझने आपली लय कायम राखताना विजय नोंदवला. अन्य पुरुष एकेरीच्या सामन्यात जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेव्हने दक्षिण आफ्रिकेच्या लॉयड हॅरिसला ७-६ (८-६), ७-६ (७-०), ६-१ असे चुरशीच्या लढतीत नमवले. तर, अमेरिकेच्या टॉमी पॉलने स्वित्र्झलडच्या डॉमिनिक स्टीफन स्ट्रिकरला ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत केले.
महिला एकेरीत सहाव्या मानांकित गॉफने स्पेनच्या रेबेका मासारोव्हाला ३-६, ६-१, ६-२ असे चुरशीच्या लढतीत नमवत दुसरी फेरी गाठली. सामन्यातील पहिला सेट गमावल्यानंतर गॉफने पुनरागमन करत पुढचे दोन्ही सेट जिंकत विजय साकारला. तर, जाबेऊरने इटलीच्या लुसिया ब्रोंझेट्टीला ६-४, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत आगेकूच केली.