जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थानी राफेल नदाल याने नुकतीच फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली आणि ११ व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचे त्याने सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. नदालने ही लढत ६-४,६-३, ६-२ अशी सहज जिंकली. सुमारे २ तास ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात थिमला एकही सेट जिंकता आला नाही. नदालने सामन्यावर पूर्ण पकड ठेवत १४ वर्षांपैकी ११ वर्षे फ्रेंच खुली टेनिस स्पर्धेचा मान मिळवला.
या विजयाबद्दल नदाल भरपूर बोललाच, पण त्याबरोबरच नदालने त्याच्या आयुष्यातील एका अशा टप्प्याबाबत सांगितले, ज्याबाबत फारसे कोणालाही माहिती नव्हते. नदाल म्हणाला की सलग दोन वर्षे मी एकाही स्पर्धेचे विजेतेपद जिंकू शकलेलो नव्हतो. माझ्यातील खेळ कितपत शिल्लक राहिला आहे? याबाबत मलाच माझे प्रश्न पडत होते. त्यावेळी मला प्रचंड नैराश्य आले होते आणि त्यामुळे मी आतापर्यंत निवृत्त व्हायला हवे होते, असे नदाल म्हणाला.
३२ वर्षीय नदाल असेही म्हणाला की २०१६ आणि २०१७ या २ वर्षात मला अनेक सामन्यात अपयश आले. मी ग्रँड स्लॅम स्पर्धाही खेळलो. पण मला कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद मिळू शकले नाही. आता या वयात मी पुन्हा स्पर्धा खेळू शकेन की नाही, असा विचारही माझ्या मनात डोकावला. पण अखेर यंदाचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे ग्रँड स्लॅम विजेतेपद मी मिळवू शकलो. त्यावेळी मी नैराश्यात कदाचित निवृत्तीचा निर्णय घेतला असता, तर आतापर्यंत मी कदाचित निवृत्त झालो असतो आणि माझे स्वतःचे कुटुंब, मुले-बाळे यांच्यात रमलो असतो, असेही तो म्हणाला.
ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या स्पर्धेत फेडररला मागे टाकण्याबाबतही नदालने आपले मत व्यक्त केले. मलाही फेडररसारखी २० ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकायला आवडेल. पण सध्या मी १७ विजेतेपदे मिळवली आहेत आणि तेदेखील कमी नाही. सध्या मला माझा खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. फेडररशी स्पर्धा करण्याचा तूर्तास विचार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.