Asia Cup 2023 security: आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान आहे. ४ पाकिस्तानात आणि फायनलसह इतर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सामन्यांदरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सही तैनात केले जातील, त्याला शनिवारी मंजुरी मिळाली आहे.
आशिया चषक २०२३ दरम्यान सुरक्षाव्यवस्था निश्चित करण्यासाठी फेडरल कॅबिनेटने पाकिस्तान आर्मी आणि पंजाब रेंजर्सच्या तैनातीला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंजाबच्या काळजीवाहू सरकारने लष्कर आणि रेंजर्सच्या तैनातीची विनंती केली होती आणि या संदर्भात एक अहवाल गृह मंत्रालयाने पाठविला होता ज्याला मंत्रिमंडळाने संचलनाद्वारे मान्यता दिली होती.”
वृत्तानुसार, लष्कर आणि पंजाब रेंजर्स २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत तैनात असतील. अहवालात एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंजाब रेंजर्स दुसऱ्या स्तरावरील क्विक रिअॅक्शन फोर्स (क्यूआरएफ) मध्ये तैनात केले जातील, तर पाकिस्तानी लष्कराची तैनाती तिसऱ्या स्तरावरील क्यूआरएफ मोडमध्ये असेल.”
सुरक्षेसाठी विशेष लष्करी दल सज्ज असतील असेही त्यांनी सांगितले. सलामीच्या सामन्यासह आशिया चषकाचे ४ सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानचा शेवटचा सामना ६ सप्टेंबरला आहे. पाकिस्तानमधील पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे होणार आहे, तर इतर ३ सामने लाहोरमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला ५ आणि ६ तारखेला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणारा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकतात.
बिन्नी आणि राजीव शुक्ला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जाणार आहेत
पीटीआयने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी २ सप्टेंबर रोजी कॅंडीला जातील. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्टला सर्वजण भारतात परततील. त्यानंतर रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जातील. तो सामना लाहोरला असणार आहे.”
टीम इंडिया या स्पर्धेतील एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. त्यांचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर ४ सप्टेंबरला नेपाळशी सामना होणार आहे. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत.
आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के.एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, स्टँडबाय खेळाडू: संजू सॅमसन