ऑलिम्पिक म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय. सव्वाशे कोटी लोकांच्या भारताने क्रिकेटमध्ये जितके यश संपादन केले, तितकेच ऑलिम्पिकमध्ये का करू शकला नाही, याची चर्चा ऑलिम्पिक स्पर्धा तोंडाशी आली की प्रत्येक जण करत असतो. पण द्वारकानाथ संझगिरी लिखित ‘थेम्सच्या किनाऱ्यावरून’ या पुस्तकाच्या निमित्ताने २०१२ लंडन ऑलिम्पिकच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
लंडन हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक पदके मिळवून देणारे ऑलिम्पिक ठरले. ब्रिटिशांच्या राजवटीचे दर्शन घडवणारा लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाचा थाट ते समारोपापर्यंतचा प्रवास, ऑलिम्पिकनंतर लंडनला जाणवणारी आर्थिक चणचण याविषयी सविस्तर लेखन या पुस्तकाद्वारे वाचायला मिळणार आहे.  मायकेल फेल्प्सचा सर्वाधिक ऑलिम्पिक पदकांचा विक्रम..सर्वाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी युसेन बोल्ट यांची अदाकारी.. चिनी खेळाडूंचे ऑलिम्पिकवरील वर्चस्व.. या विषयीचे लेख वाचनीय
आहेत. सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा महान सायकलपटू ब्रॅडली विगिन्स यांच्यातील तुलनात्मक खेळ हा आपला सचिन किती महान आहे, याची साक्ष पटवून देतो.
लंडन ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी या विषयीही सुरेख लिखाण या पुस्तकात केले आहे. लढवय्यी मेरी कोम, कांस्यपदकावर मोहोर उमटवणाऱ्या सायना नेहवालची कामगिरी, बीजिंगमधील सुवर्णपदक विजयानंतर लंडनमध्ये अभिनव बिंद्राला आलेले अपयश.. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या कुस्तीपटूंची ऐतिहासिक झेप.. या विषयीही संझगिरी यांनी आपल्या शैलीनुसार अप्रतिम लिखाण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा