नशीबवान रोहित!
अखेरचा फलंदाज मोहम्मद शामीला साथीला घेत रोहित शर्माने झुंजार शतकी खेळी साकारली, पण त्याला या वेळी नशिबाचीही साथ लाभली आणि गमतीदार एक किस्साही घडला. रोहित शामीला जास्त फलंदाजी देत नव्हता आणि प्रत्येक षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत स्वत: फलंदाजी घेत होता. पण ९९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितने जोरदार फटका मारला, वेस्ट इंडिजचे क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावले नाहीत. त्यांना चौकार देऊन शामीला फलंदाजीसाठी आणायचे होते. पण नशीब रोहितच्या बाजूने असल्याने चेंडूने सीमारेषा गाठलीच नाही. वेस्ट इंडिजचे खेळाडू हताश झाले आणि रोहितने एकेरी धाव घेतल्याने स्टेडियममध्ये एकच हशा पिकला. त्यानंतरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने जोरदार फटका मारला, पण तिसऱ्या पंचांनी हा ‘नो बॉल’ असल्याचे दर्शवले आणि रोहितवर नशीब पुन्हा मेहेरबान झाले. या जीवदानाचा फायदा उचलीत त्याने सलग दुसरे शतक झळकावले.
अर्जुन ‘बॉल बॉय’च्या भूमिकेत
साधारण २६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, १९८७च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ‘बॉल बॉय’च्या भूमिकेत पाहायला मिळालेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता कारकिर्दीच्या अखेरच्या कसोटीत खेळत आहे. पण सचिनच्या या ऐतिहासिक सामन्यात ‘बॉल बॉय’च्या भूमिकेत दिसला तो सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुन गेल्या वर्षी मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाचा सदस्य होता. आपल्या वडिलांचा अखेरचा सामना मैदानात बसून पाहण्याची सुवर्णसंधी अर्जुनला या निमित्ताने मिळाली.
सॅमीच्या झेलांचे पंचक
वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने गोलंदाजी केली, कप्तानीही केली, पण त्याची भारताच्या पहिल्या डावातील लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याने पकडलेले पाच झेल. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना मानल्या जाणाऱ्या सॅमीने या वेळी भारताचा अर्धा संघ माघारी धाडण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने सलामीवीर मुरली विजय, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांचे झेल टिपले. या सर्वामध्ये त्याने नरसिंग देवनरिनच्या गोलंदाजीवर सचिनचा पकडलेला स्लिपमधील झेल तर अप्रतिम असाच होता.
एल. प्रसाद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा