उत्साह, उत्कंठा, निराशा, जल्लोष या साऱ्यांची अनुभूती यंदा क्रीडाविश्वात घडलेल्या घटनांनी दिली. वेगसम्राट उसेन बोल्ट आणि जलमासा मायकेल फेल्प्सने जगभरातील चाहत्यांना अपार आनंद दिला. यांत्रिक पायांनिशी सक्षम माणसांच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या ऑस्कर पिस्टोरिअसच्या जिद्दीला जगाने सलाम केला. तर दुसरीकडे आतापर्यंत कर्करोगाचा मुकाबला करून ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीचा बादशहा ठरलेल्या लान्स आर्मस्ट्राँगची कलंकित बाजू जगासमोर आली. टेनिसविश्वाला यंदाच्या वर्षांने एक नवा तारा दिला. ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि अमेरिकन खुली स्पर्धा जिंकत अँडी मरेने ‘फेडरर-नदाल-जोकोव्हिच’ यांची जेतेपदावरली सद्दी मोडण्याचे अवघड काम केले. फॉम्र्युला वनच्या सफरीतही सेबॅस्टियन वेटेलने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावत आपल्या चाहत्यांना खुश केले. सरत्या वर्षांतल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा हा आढावा..
अझारेन्काची जोरदार सलामी
ग्रँडस्लॅम स्पर्धाचा श्रीगणेशा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेने होतो. यंदा जेतेपदावर नाव कमावणाऱ्या मानकऱ्यांसाठी हे जेतेपद आणखी खास होते. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी व्हिक्टोरिया अझारेन्का ही बेलारूसची पहिली टेनिसपटू ठरली. योगायोगाने अझारेन्काचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद. मातब्बर प्रतिस्पर्धी मारिया शारापोव्हाचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवत अझारेन्काने हे जेतेपद संस्मरणीय ठरवले. पुरुषांमध्ये ५ तास आणि ५३ मिनिटांच्या कडव्या संघर्षांनंतर राफेल नदालला चीतपट करत नोव्हाक जोकोव्हिचने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या इतिहासातला हा सर्वाधिक कालावधीचा अंतिम सामना ठरला.
लाल मातीवर शारापोव्हा, नदालचा विक्रम
कारकीर्दीत ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. महिलांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच टेनिसपटूंनी हा विक्रम नावावर केलाय. यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या निमित्ताने मारिया शारापोव्हाने ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण केले. शारापोव्हाने सारा इरानीवर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला. ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करणारी ती केवळ दहावी महिला टेनिसपटू ठरली. पुरुषांमध्ये राफेल नदालने तब्बल सातव्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.
फेल्प्सचा सुवर्णसूर
तरणतलावात सूर मारायचा तो सुवर्णपदकासाठी अशापद्धतीने आख्यायिका बनलेल्या मायकेल फेल्प्सने लंडन ऑलिम्पिकमध्ये आपला करिश्मा दाखवला. युवा रॉयल लॉक्टला अवघ्या काही सेकंदांनी मागे टाकत फेल्प्सने २०० मी प्रकारात सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रकारात त्याने २००४ अ‍ॅथेन्स ऑलिम्पिक , २००८ बीजिंग ऑलिम्पिक आणि लंडन ऑलिम्पिक अशा तीन सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या फेल्पसने थोडीथोडकी नव्हे तर एकूण २२ आणि १८ ऑलिम्पिक सुवर्णपदके नावावर करण्याचा विक्रम नावावर केला.
वेगाचा सम्राट!
१०० मी. धावण्याची शर्यत म्हटलं की जमैकाच्या उसेन बोल्ट आपल्या डोळ्यासमोर लगेच उभा राहतो. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये या प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या बोल्टने लंडनमध्येही बाजी मारली. योहान ब्लेकसह अन्य तगडय़ा प्रतिस्पध्र्याना लीलया मागे टाकत बोल्टने जेतेपद पटकावण्याची किमया साधली. १०० मीटरपाठोपाठ २०० आणि ४०० मीटर रिले शर्यतीमध्येही बोल्टने आपली हुकूमत गाजवली. बोल्टची ही अद्भुत कामगिरी हजारो प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवली तर लाखोंनी टीव्हीच्या माध्यमातून या बोल्टच्या चमत्कारिक कामगिरीचा आनंद घेतला.
जिद्दीचे ‘ऑस्कर’
धावण्याची शर्यत कोणत्याही सक्षम माणसांसाठी निश्चित आव्हान असते, तिथे अपंग माणसांची काय कथा. पण दुर्दम्य मानवी इच्छाशक्तीचे अविश्वसनीय उदाहरण ऑस्कर पिस्टोरिअसच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गुडघ्याखाली ब्लेड आकाराचे यांत्रिक पाय असणाऱ्या ऑस्करने सक्षम माणसांच्या शर्यतीत भाग घेतला. आपल्या व्यंगाचा कोणताही बाऊ न करता, यांत्रिक पायांची बलस्थाने आणि त्रुटी लक्षात घेऊन, नैसर्गिक शरीर आणि यांत्रिक पाय यांचा सुरेख मिलाफ साधत ऑस्करने ४०० मीटर शर्यतीत सहभाग घेतला. आपल्या अविश्वसनीय प्रदर्शनाने जगाच्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तींसाठी जिवंत प्रेरणास्थान ठरलेल्या ऑस्करने जेतेपद पटकावले नाही पण लाखो चाहत्यांची मने जिंकली.
मरेची गरुडझेप
टेनिसविश्वात गेली काही वर्ष सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारा खेळाडू म्हणजे अँडी मरे. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या त्रिकुटाच्या सद्दीमुळे जेतेपद मरेला अलगद हुलकावणी देत असे. पण हे सारे कटू क्षण दूर सारत मरेने यंदा जोरदार मुसंडी मारली. विम्बल्डनमध्ये त्याला फेडररने चीतपट केले. पण थोडय़ाच दिवसात ऑलिम्पिकमध्ये फेडररला लोळवत मरेने मानाच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर नाव कोरले. शंभर वर्षांनंतर इंग्लंडच्या सुपुत्राने हे सुवर्णपदक कमावले. या यशाने पुरेसे समाधान न झालेल्या मरेने अमेरिकन खुल्या स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचला नमवत इतिहास घडवला. १९३६ नंतर या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मरे इंग्लंडचा पहिला टेनिसपटू ठरला.
‘खरा’ आर्मस्ट्राँग जगासमोर
कर्करोगाशी संघर्ष केल्यानंतर ‘टूर डी फ्रान्स’ या प्रतिष्ठेच्या आणि शारीरिकदृष्टय़ा खडतर असलेल्या सायकल शर्यतीचे सात वेळा जेतेपद पटकावणाऱ्या लान्स आर्मस्ट्राँगचा खरा चेहरा जगासमोर आला. आर्मस्ट्राँग ही जेतेपदे नैसर्गिक क्षमतेच्या नव्हे तर उत्तेजकांच्या बळावर मिळवत होता, हे अमेरिकन उत्तेजक विरोधी संघटनेने (यूएसएडीए) पुराव्यासहित सिद्ध केले. या संस्थेने खंडप्राय अहवालासह आर्मस्ट्राँगच्या कृष्णकृत्यांचा बुरखा फाडला. त्यांच्या या कारवाईमुळे आर्मस्ट्राँग, त्याचा कर्करोगविरोधी लढा, त्यावर आधारलेले अर्थकारण हे सारे उन्मळून पडले.
वेटेल एक्स्प्रेस!
जर्मनीच्या २४ वर्षीय सेबॅस्टियन वेटेलने फॉम्र्युला-वन शर्यतीच्या विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. ही किमया करणारा तो सर्वात युवा ड्रायव्हर ठरला आहे. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सो याचे आव्हान अखेरच्या शर्यतीत मोडीत काढत वेटेलने ड्रायव्हर चॅम्पियनशिपवर नाव कोरले आणि आपणच जगात सर्वात वेगवान असल्याचे दाखवून दिले.

Story img Loader