आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा एका धावेने झालेला पराभव पंजाबची संघ मालक अभिनेत्री प्रिती झिंटा हिला सहन न झाल्याने तिने संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांना स्टेडियमवरच शिवीगाळ केल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिले आहे. याशिवाय, तिने बांगर यांना संघातून बाहेर काढण्याचीही धमकी दिल्याचे समजते.
भारतीय संघाचे माजी कसोटीपटू संजय बांगर हे सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक आहेत. प्रिती झिंटाच्या या संघाची कामगिरी यंदा सुमार राहिली असून, संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. यात सोमवारी बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पंजाबला केवळ एका धावेने पराभव स्विकारावा लागला. याचे सारे खापर प्रितीने संजय बांगर यांच्यावर फोडले. फलंदाजीची क्रमवारी बदलण्याचा बांगर यांचा निर्णय प्रितीला पटला नव्हता आणि त्यावरून प्रितीची बांगर यांच्यासोबत डगआऊटमध्ये शाब्दीक वाद झाला. प्रिती ही बांगर यांच्यावर इतकी संतापली होती की तिने शिवीगाळ देखील केली, असे बाजूला उपस्थित असलेल्या काहींनी सांगितल्याचे ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पंजाब संघातील अक्षर पटेल याच्याआधी फरहानला फलंदाजीसाठी पाठविल्याने संघाचा पराभव झाला, असे प्रितीचे म्हणणे होते आणि या पराभवाचा राग तिने बांगर यांच्यावर काढला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रिती झिंटा आणि संजय बांगर यांनी असे काही घडले नसल्याचे दावा केला आहे.