आयपीएलच्या तेराव्या हंगामाची स्पॉन्सरशिप Dream 11 कंपनीला दिल्यानंतर बीसीसीआयसमोर आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. IPL च्या स्पॉन्सरशिप कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Future Group ने IPL स्पॉन्सरशिपसाठी असलेला आपला करार रद्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका Future Group ला बसला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये नवीन कंपनी Future Group टेकओव्हर करण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत आपली विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी Future Group ने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

“हो, Future Group ने IPL स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली आहे. याच कारणासाठी IPL संकेतस्थळावरुन त्यांचा लोगो हटवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला याविषयी तुम्हाला अधिक माहिती देता येणार नाही.” बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. याप्रकरणी पीटीआयने Future Group च्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. परंतू तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे गेल्या काही महिन्यांत Future Group आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे हा निर्णय होणारच होता. बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार Future Group ला ४० कोटींची रक्कम देणं अपेक्षित आहे. परंतु सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी स्पॉन्सरशिपमधून माघार घेतल्याचा निर्णय हा फारसा आश्चर्यकारक नाही.

सध्याच्या घडीला Future Group मध्ये मोठे बदल सुरु आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये Future Group टेकओव्हर करण्याबाबत अनेक MNC शी चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत आयपीएल सारख्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देणं हे Future Group ला शक्य झालं नसतं अशी माहिती तज्ज्ञ व्यक्तीने पीटीआयशी बोलताना दिली. दरम्यान तेराव्या हंगामासाठी BCCI ने Dream 11 ला स्पॉन्सरशिपचे हक्क दिले असून यासाठी Dream 11 ने २२२ कोटी रुपये मोजले आहेत. याव्यतिरीक्त Unacademy आणि Cred या दोन ब्रँड नाही स्पॉन्सरशिपचे हक्क देण्यात आले असून त्यांच्याकडून बीसीसीआयने प्रत्येकी ४०-४० कोटी रुपये घेतले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.