गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवरील खेळपट्टीचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) खेळपट्टी समितीचे प्रमुख दलजित सिंग यांनी सांगितले.
गहुंजे खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राने सातशे धावा केल्यानंतर तेथील खेळपट्टीविषयी दलजित सिंग यांना साशंकता वाटत आहे. ते म्हणाले, रणजी स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यांच्या वेळी खेळपट्टय़ा चांगल्या होत्या. मात्र पुण्यातील सामन्यात पहिल्या तीन दिवसांमध्ये एक हजारपेक्षा जास्त धावा निघाल्यामुळे तेथील खेळपट्टीविषयी मला काळजी वाटत आहे. रणजी सामन्यांमध्येही गोलंदाज व फलंदाज या दोघांनाही अनुकूल राहील अशी खेळपट्टी करण्याची आवश्यकता आहे. सुरत येथील खेळपट्टीबाबत पुनरावलोकनाची गरज आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस अनुकूल ठरणे हे चुकीचे आहे. कोलकाता, नवी दिल्ली आदी ठिकाणच्या खेळपट्टय़ा अव्वल दर्जाच्या ठरल्या आहेत.
इंग्लंड व भारत यांच्यातील मालिकेच्या वेळी खेळपट्टी कशी राहील असे विचारले असता दलजित म्हणाले, या मालिकेतील सामन्यांच्या वेळी खेळपट्टी गोलंदाज व फलंदाज या दोघांनाही अनुकूल असेल. कसोटी सामनेही रंजक करण्याचा आमचा दृष्टिकोन असेल. अर्थात, प्रत्येक ठिकाणी असणारे हवामान व माती यांचाही परिणाम खेळपट्टीवर होऊ शकतो.    
दलजित यांचे विधान चुकीचे -बागवान
पुण्याच्या खेळपट्टीविषयी दलजित सिंग यांनी केलेले विधान अतिशय चुकीचे आहे. पुण्यात न येता दिल्लीत बसून येथील खेळपट्टीविषयी वाटेल ती विधाने करणे खेळास मारक आहे. केदार जाधव याने केलेल्या त्रिशतकाचे कौतुक न करता त्यांनी अप्रत्यक्षपणे त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे, असे महाराष्ट्राचे माजी रणजीपटू व स्पर्धा समिती प्रमुख रियाज बागवान यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी अव्वल दर्जाची फलंदाजी केली आहे. उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना येथे यश मिळाले नाही हा त्यांचा दोष आहे. खेळपट्टीबाबत चुकीचे आरोप करीत दलजित यांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांचा अवमान केला आहे.

Story img Loader