महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) गहुंजे येथे बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची ‘सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम’ ही पाटी झाकण्यात आल्यामुळे हे स्टेडियम आता ‘बेसहारा’ झाले की काय अशीच चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
संघटनेने तीनशे कोटी रुपये खर्च करून पुण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधले होते व त्याचे उद्घाटन एक एप्रिल २०१२ मध्ये करण्यात आले होते. या स्टेडियमकरिता सहारा परिवार समूहाने दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिल्यानंतर सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले होते. नुकताच या स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यात ट्वेन्टी२० सामना आयोजित करण्यात आला होता. या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
स्टेडियमची पाटी झाकण्याचे कारण काय, असे विचारले असता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले, सहारा परिवार व एमसीए यांच्यात या संदर्भात गुप्ततेबाबत करार झाला असल्यामुळे आम्ही कोणतेही विधान करू शकणार नाही.

Story img Loader