गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर आयपीएलच्या सहाव्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यात खेळू शकणार नाही. मोहाली कसोटीत शानदार पदार्पण करणारा शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी धवनच्या जागी गौतम गंभीरची निवड झाली होती. मात्र त्याला काविळीचे निदान झाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही.
या आजारातून सावरण्यासाठी गंभीरला तीन आठवडय़ांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत गंभीर खेळू शकणार नाही. ३ एप्रिलपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. गंभीरच्या अनुपस्थितीत जॅक कॅलिस किंवा ब्रेंडान मॅक्युल्लम यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात ब्रेंडान मॅक्युल्लमने कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व केले होते. या हंगामात संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. दरम्यान कॅलिस तंदुरुस्त आणि उपलब्ध असल्यास तो संघातील सगळ्यात वरिष्ठ खेळाडू असणार आहे. त्यामुळे कर्णधारपदासाठी कॅलिसला पसंती मिळण्याची शक्यता आहे.
गंभीरने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत दिल्लीतर्फे खेळताना पंजाबविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. त्याने ५४ चेंडूत ६८ धावांची खेळी केली आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.

Story img Loader