यशाचे परिमाण अभ्यासताना वयाचा निकष कळीचा मुद्दा ठरतो. खेळाडूंसाठी वय हे दुधारी शस्त्र आहे. वाढत्या वयाबरोबर खेळात आणि विचारात परिपक्वता येते, मात्र त्याच वेळी इतकी वर्षे साथ देणाऱ्या शरीराची असहकाराची मालिका सुरू झालेली असते. वाढत्या वयाबरोबर अनुभवाची शिदोरी बळकट होते. पण मनाची ऊर्मी तीव्र असतानाही शारीरिक हालचाली मंदावू लागतात. मात्र हे सगळे चौकटीतील साचेबद्ध आयुष्य रेटणाऱ्या मंडळींसाठी. लिएण्डर पेस, सेरेना विल्यम्स यांनी टेनिस विश्वात रूढार्थाने प्रौढ समजल्या जाणाऱ्या वयातही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मोहोर उमटवली. या दोघांचा खेळ, कोर्टवरील वावर आणि उत्साह पाहून त्यांच्या नावापुढच्या रकान्यात दिसणारा वयाचा आकडा सपशेल खोटा वाटण्याची शक्यताच अधिक आहे. पण हे सत्य आहे आणि त्यामागे आहे त्यांची खेळाप्रती असलेली अपार निष्ठा, खेळण्याची-जिंकण्याची अखंड भूक, कारकिर्दीची प्रदीर्घता वाढवण्यासाठी जीवनशैलीत केलेले अनुरूप बदल, तंत्रज्ञानाभिमुख झालेल्या खेळातले बदल अंगीकारण्याची सवय. अमेरिकन खुल्या स्पर्धेतल्या दिमाखदार यशाच्या निमित्ताने निवृत्तीकडे झुकलेल्या या चिरतरुण खेळाडूंचे यशच सहजपणे लक्ष वेधते.
लिएण्डर पेस हे अद्भुत रसायन आहे. गेली दोन दशके भारतीय टेनिस म्हटले की अपरिहार्यपणे पेसचा उल्लेख येतोच. पेसच्या बाबतीत घडलेला एक किस्सा नमूद करण्यासारखा. गेल्या वर्षी डेव्हिस चषकाच्या सामन्यात पेस युवा साथीदार सनम सिंगच्या साथीने कोर्टवर उतरला. पेसने कारकिर्दीतील पहिले जेतेपद पटकावले तेव्हा सनम अवघा दोन वर्षांचा होता. यावरून या दोघांच्या वयातील प्रचंड अंतराची दरी स्पष्ट होते. पण असल्या भौतिक गोष्टी पेसला त्रासदायक ठरत नाहीत. सनमचा युवा उत्साह व ऊर्जेला तेवढीच तोलामोलाची साथ दिली.
अमेरिकन खुल्या स्पर्धेशी असलेला पेसचा ऋणानुबंध खूप जुना आहे. १९९१मध्ये याच पेसने कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले होते. सप्टेंबर महिना उजाडला की पेसला न्यूयॉर्कचे वेध लागतात. हार्ड कोर्ट आणि भारतीय वातावरणाशी साधम्र्य असणारे हवामान यामुळे इथे पेसचा खेळ अधिकच बहरतो. पेस चाळीस वर्षांचा आणि चेक प्रजासत्ताकचा त्याचा साथीदार राडेक स्टेपानिक ३४ वर्षांचा. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याच्या इराद्यासाठी हे आकडे अगदीच विपरीत असे. परंतु पेस या सर्व गोष्टींच्या पल्याड आहे. उपांत्य फेरीत ब्रायन बंधूंवर मिळवलेल्या विजयानेच पेसच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. जगभरातल्या स्पर्धाच्या जेतपदांवर नियमितपणे हक्क सांगणाऱ्या ब्रायन बंधूंचा विजयरथ रोखण्याचे अवघड आव्हान पेसने पेलले. प्रत्येक विजयानंतर राडेकसह त्याचा विजयाचा जल्लोष पाहणेही एक सुखद अनुभव होता. कारकिर्दीतला पहिला विजय असावा, या निरागसतेने पेस आताचे विजयही साजरे करतो. यातच पेसच्या विस्तारलेल्या कारकिर्दीचे गमक आहे.
नियमित व्यायाम, नियंत्रित आहार, मानसिक कणखरतेसाठी योगासने-ध्यानधारणा ही पेसच्या यशाची गुरुकिल्ली आहे. या जीवनशैलीमुळेच दुखापतींचे चढउतार त्याने पार केले आहेत. एकेरी प्रकारात पेसच्या नावावर ऑलिम्पिक पदक आहे. मात्र आपला खेळ दुहेरीला साजेसा आहे, हे लक्षात आल्यावर त्याने दुहेरीवरच लक्ष केंद्रित केले. दुहेरीत आपल्याइतकेच साथीदाराचा खेळ समजणे आवश्यक असते. याबाबतीत पेसची आकडेवारी अचंबित करणारी आहे. पुरुष दुहेरीत ९५ तर मिश्र दुहेरीत २२ साथीदारांच्या बरोबरीने पेस खेळला आहे. यंदाच्या हंगामात पेसची कामगिरी लौकिलाला साजेशी नव्हती. परंतु सतत संघर्ष करण्याच्या, चिवटपणाच्या सर्वोत्तम प्रदर्शन देण्याच्या वृत्तीनेच चाळिसाव्या वर्षी जेतेपदाचा मान त्याने शिरपेचात खोवला आहे.
ग्रँड स्लॅम महिला टेनिस प्रकारात एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळते, याला सेरेना विल्यम्सचा झंझावाती फॉर्म कारणीभूत आहे. कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात जबरदस्त खेळाच्या जोरावर सेरेनाने विजेतेपदे, क्रमवारीतील अव्वल स्थान, पैसा सारे काही कमावले. मात्र यानंतर दुखापती, अपघात यांचा दुर्दैवी फेरा तिच्यामागे लागला. मात्र त्यामुळे सेरेनाचा टेनिसचा ध्यास हिरावला गेला नाही. कोर्टवर असो किंवा वैयक्तिक आयुष्यात, जितका मोठा आघात तितकेच दमदार पुनरागमन हे सेरेनाचे खास वैशिष्टय़ आहे. गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत नवख्या खेळाडूकडून तिला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र याचा वचपा तिने विम्बल्डन, ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावून काढला. चालू वर्षीही विम्बल्डनमध्ये सबिन लिइस्कीने तिला नमवले. परंतु पुढच्याच अर्थात अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने जेतेपदाचा मुकुट नावावर केला. अंतिम लढत जिंकल्यानंतर तिने मारलेल्या उडय़ा बालिश वाटू शकतात, मात्र त्या मारायलाही अफाट तंदुरुस्ती लागते, जी फक्त सेरेनाकडे आहे. अविरत सराव, बिनतोड सव्‍‌र्हिसवरचे प्रभुत्व आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचा अचूक अभ्यास याच्या बळावरच ३१व्या वर्षीही जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.
या दोघांच्या तुलनेत पुरुष एकेरीचा विजेता नदाल वयाने लहान आहे. गंभीर स्वरूपाच्या दुखापतींमुळे नदालला अनेक वेळा प्रतिष्ठेच्या स्पर्धाना मुकावे लागले. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्येही दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले. गुडघ्याच्या दुखापतीने त्याचे २०१२ वर्ष जवळपास वाया गेले. या गंभीर दुखापतीमुळे शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तो वयस्करच झाला. पण विजिगीषू वृत्तीचे जिवंत उदाहरण ठरावे अशा पद्धतीने त्याने या मोसमात पुनरागमन केले. फ्रेंच ग्रँड स्लॅम जेतेपदाने त्याने आपल्या सर्व प्रतिस्पध्र्याना धोक्याचा इशारा दिला. पण विम्बल्डनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. अखेर अमेरिकन स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवत त्याने ग्रँड स्लॅम जेतेपदांची संख्या १३वर नेली. १७ ग्रँड स्लॅम आपल्या नावावर असणाऱ्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडरर सूर्यास्त जवळ आला आहे. नव्या उमेदीने, जोशाने पुनरागमन करणाऱ्या नदालला आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम खुणावू लागला आहे.

 

Story img Loader