Sourav Ganguly on Ajinkya Rahane: भारताला १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलमध्ये खेळणार आहे. त्याचवेळी १८ महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले. मात्र, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने निवडकर्त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि निवड प्रक्रियेत स्थिरता आणि सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
दीड वर्षापूर्वी रहाणेकडून उपकर्णधारपद हिरावून घेतले होते
३५ वर्षीय रहाणे गेल्या दीड वर्षांपासून संघाबाहेर होता पण या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ओव्हल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ४६ अशा सर्वाधिक धावा करणारा तो भारताचा एकमेव असा फलंदाज होता. त्याच्या या कामगिरीमुळे हंगामी मुख्य निवडकर्ता शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणेची रोहित शर्माचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली.
अजिंक्य रहाणे २०२१च्या इंग्लंड दौऱ्यावर उपकर्णधार होता. कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रहाणेलाही संघातून वगळण्यातही आले होते.
गांगुली जडेजाला उपकर्णधारपदाचा दावेदार मानतो
कर्णधारपदाच्या या भूमिकेसाठी शुबमन गिलसारख्या व्यक्तीला तयार करण्याची ही योग्य वेळ नाही का, असे विचारले असता? यावर उत्तर देताना गांगुली म्हणाला, “होय, मला असे वाटते. मात्र, गांगुलीने रहाणेच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचे वर्णन ना वाईट म्हटले, ना चांगले असे केले.” तो पुढे म्हणाला, “बीसीसीआयने एक पाऊल मागे घेतले असे मी म्हणणार नाही. तुम्ही १८ महिने संघाबाहेर आहात, त्यानंतर तुम्ही एक कसोटी खेळता आणि थेट उपकर्णधार बनता. यामागील विचारप्रक्रिया मला समजत नाही. रवींद्र जडेजा आहे, तो बराच काळ संघासोबत आहे आणि कसोटी सामन्यांमध्ये तो खेळेल याची खात्री आहे. तो यापदाचा प्रबळ दावेदार आहे.
सौरव गांगुलीने पुजाराबाबत केले मोठे विधान
भारताच्या सर्वोत्तम कसोटी कर्णधारांपैकी एक असलेला गांगुली म्हणाला, “१८ महिन्यांनंतर संघात परत येणे आणि थेट उपकर्णधार होणे हे मला समजत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की निवडीत सातत्य असावे. भारतीय निवडकर्त्यांनी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळून बदल केले आहेत. त्याच्याशी आधी तुम्ही बोलणे अपेक्षित होते.”गांगुलीने भारतासाठी १०० हून अधिक कसोटी खेळलेल्या खेळाडूशी स्पष्ट संवाद साधावा अशी असे त्याला वाटते.
माझी बीसीसीआय अध्यक्ष गांगुली पुढे म्हणाला, “निवडकर्त्यांना पुजाराबद्दल स्पष्ट कल्पना असायला हवी. निवडकर्त्यांना पुजाराने पुन्हा कसोटी खेळायची आहे की त्यांना युवा खेळाडूंसोबत पुढे जायचे आहे. याबाबत पुजाराशी स्पष्ट संभाषण व्हायला हवे. पुजारासारखे खेळाडू हे दशकात एकदाच तयार होतात. जो थोडा चांगला खेळतो त्याला उचललून संघात घेतात अन् नंतर बाहेर टाकून देतात. मग ज्याला बाहेर टाकतात त्यालाच पुन्हा संघात घेतात… हाच खेळ अजिंक्य रहाणेच्या बाबतीत केला. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.”