भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा त्याच्या वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असतो. लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने नॅटवेस्ट मालिका जिंकली, तेव्हा सौरव गांगुलीने आपला टी शर्ट हवेत फिरवून इंग्लंडला त्यांच्या शब्दात उत्तर दिले होते. तो क्षण अजूनपर्यंत प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या नक्कीच लक्षात असेल. कारण गांगुली कोणत्याही गोष्टीच सेलिब्रेशन हे ‘दादा’ पद्धतीनेच करतो. पण मैदानात आक्रमक असलेला गांगुली एखाद्या पार्टीमध्ये गेला, तर मात्र पूर्णपणे वेगळा दिसतो.
सध्या गांगुलीचा अशाच एका छोटेखानी पार्टीतील डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील एका क्रुझवरील क्लबमध्ये गांगुली हा डान्स करत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर या व्हिडिओबरोबर फिरत आहेत. मात्र या व्हिडीओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे? आणि कधीचा आहे? हे अधिकृतपणे अद्याप समजू शकलेले नाही. पण या व्हिडिओमध्ये दादा आपल्या डान्सची जादू दाखवत आहे. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहाम या दोन अभिनेत्यांनी ‘देसी बॉईझ’ नावाच्या चित्रपटात ‘ सुबह होने न दे.. साथ खोने ना दे’ या पार्टी सॉंगवर डान्स केला होता. ते गाणे प्रचंड हिट झाले होते. याच गाण्यावर गांगुली थिरकताना दिसत आहे. आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर भरपूर व्हायरल होत आहे.