दीपक जोशी
न्यूझीलंडचे दोन प्रमुख फलंदाज मार्टिन गप्टिल आणि कर्णधार केन विल्यम्सन यांना बुधवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विक्रम खुणावत आहेत. न्यूझीलंडतर्फे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्टीफन फ्लेमिंग १०७५ धावांसह अग्रस्थानी आहे. गप्टिलच्या नावावर सध्या ९४२ धावा असून त्याला विश्वचषकात १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ५८, तर फ्लेमिंगला मागे टाकण्यासाठी १३४ धावांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सलग दोन सामन्यांत शतक झळकावणाऱ्या विल्यम्सनने पाकिस्तानविरुद्धही शतक साकारले तर विश्वचषकात न्यूझीलंडतर्फे सलग तीन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरेल. गप्टिलने २०१५च्या विश्वचषकात सलग दोन शतके झळकावली होती. दुसरीकडे पाकिस्तानच्या वहाब रियाझने (३२) तीन बळी मिळवल्यास विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो इम्रान खानला (३४) मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येईल. वसीम अक्रम ५५ बळींसह या यादीत अग्रस्थानी आहे.