बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये होणारा प्रत्येक मुकाबला चुरशीचा होतो. ‘कोपा डेल रे’ चषकाच्या अंतिम लढतीत आमनेसामने आलेल्या या प्रतिस्पध्र्यामध्ये सामना संपायला सहा मिनिटे असताना १-१ अशी बरोबरी होती. कोटय़वधी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलेल्या गॅरेथ बॅलेने आपली पत सिद्ध करत निर्णायक गोल केला आणि रिअलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
बार्सिलोनाच्या संघात लिओनेल मेस्सी, नेयमार, आंद्रेस इनेस्टा असे दिग्गज खेळाडू आहेत. त्या तुलनेत रिअल माद्रिदसाठी आतापर्यंत ख्रिस्तियानो रोनाल्डो हाच हुकमी एक्का होता. दुखापतीमुळे रोनाल्डो या लढतीत खेळू शकला नाही. मात्र यंदाच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गॅरेथ बॅलेने रिअल माद्रिदसाठी आपली उपयुक्तता सिद्ध करत जेतेपद मिळवून दिले. बरोबरीची कोंडी फोडणे कठीण आहे, असे वाटत असतानाच बॅलेने कौशल्याने बार्सिलोनाचा बचावपटू मार्क बार्टाला चकवत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने वळवला. यानंतर बार्सिलोनाचा गोलरक्षक जोस मॅन्युअल पिंटोचा अडसरही बाजूला सारत त्याने सुरेख गोल केला. बॅलेच्या गोलसह रिअल माद्रिदने २-१ अशी आघाडी मिळवली आणि उर्वरित चार मिनिटांत बार्सिलोनाच्या आक्रमणाला थोपवत त्यांनी विजय आपलासा केला.
तत्पूर्वी, पहिल्या सत्रात अकराव्या मिनिटाला रिअलतर्फे अँजेल डि मारियाने करिम बेन्झामाच्या पासवर गोल करत रिअलचे खाते उघडले. झटपट सलामीच्या आनंदाने आत्मविश्वास उंचावलेल्या रिअलच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार आक्रमण केले. मात्र बार्सिलोनाने कणखर बचावाचा मार्ग अवलंबला. मेस्सी, नेयमार द्वयीने सातत्याने गोलसाठी व्यूहरचना केली. मात्र रिअलच्या बचावपटूंना भेदणे त्यांना जमले नाही. दुसऱ्या सत्रात झाव्हीच्या पासवर बार्टाने हेडरद्वारे गोल करत बार्सिलोनाला बरोबरी करून दिली.
बरोबरीनंतर दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. निर्णायक गोल करणाऱ्या बॅलेने या कालावधीत गोलसाठी कसून प्रयत्न केले. मेस्सीनेही आपला सारा अनुभव तर नेयमारने जबरदस्त ऊर्जा पणाला लावत गोलसाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र अखेर बॅलेने सरशी साधली. गेल्या वर्षी या स्पर्धेत रिअलला अंतिम लढतीत अॅटलेटिको माद्रिदकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता रिअलने इतिहास घडवला.
कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धा : बॅलेचे बल्ले-बल्ले!
बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये होणारा प्रत्येक मुकाबला चुरशीचा होतो. ‘कोपा डेल रे’ चषकाच्या अंतिम लढतीत आमनेसामने आलेल्या
First published on: 18-04-2014 at 12:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gareth bale helps real madrid beat barcelona in copa del rey cup