नवी दिल्ली : चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरण्याचा मान मिळवल्याबद्दल भारताच्या दोम्माराजू गुकेशचे रशियाचा दिग्गज बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हने तोंडभरून कौतुक केले. आपल्या मार्गातील सर्व अडथळे पार करून गुकेशने बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्याने ज्या वयात हे यश संपादन केले, ते फारच कौतुकास्पद आहे, असे कास्पारोव्ह म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंगापूर येथे झालेल्या १४ डावांच्या लढतीतील अखेरच्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशने अविश्वसनीय विजय साकारला आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तो १८वा जगज्जेता ठरला. या दरम्यान त्याने कास्पारोव्हचा विक्रम मोडीत काढला. कास्पारोव्हने १९८५ मध्ये वयाच्या २२ वर्षी अनातोली कार्पोव्हाला पराभूत करत जगज्जेतेपद पटकावले होते. मात्र, गुकेशने १८व्या वर्षीच ही कामगिरी केली. त्यामुळे तो सर्वांत युवा जगज्जेता ठरला आहे.

हेही वाचा : D Gukesh : विश्वविजेत्या गुकेशचं बक्षीस पंतच्या IPL लिलावातील किमतीच्या निम्म्याहूनही कमी; १३ क्रिकेटपटूंना मिळालेत जास्त पैसे

‘‘गुकेशने बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर केले आहे. आपल्या मार्गातील सर्व अडथळे आणि प्रतिस्पर्ध्यांवर त्याने मात करत इतका मोठा पल्ला गाठला आहे. विशेषत: त्याचे वय पाहता त्याची कामगिरी अधिकच खास ठरते. त्याच्या वयात याहून मोठे यश कोणी मिळवू शकत नाही,’’ असे कास्पारोव्हने ‘एक्स’वर लिहिले.

हेही वाचा : आनंदनंतरचा विश्वनाथ! सर्वांत तरुण बुद्धिबळ जगज्जेता डी. गुकेश

u

तसेच डिंग आणि गुकेश यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीच्या दर्जावर टीका करणाऱ्यांनाही कास्पारोव्हने खडे बोल सुनावले. याआधीच्या लढतींमध्येही खेळाडूंकडून चुका झाल्या होत्या हे विसरू नका, असे कास्पारोव्ह म्हणाला.

हेही वाचा : D Gukesh : गुकेशच्या जगज्जेतेपदाचं धोनी कनेक्शन! क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाने केली मदत

‘‘माझ्या मते, गुकेश आणि डिंग यांच्यातील लढत उच्च दर्जाची झाली. डिंगने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. चुका कोणत्या जगज्जेत्याकडून झालेल्या नाहीत किंवा जगज्जेतेपदाची कोणती लढत चुकांविना झाली आहे? मीसुद्धा चुका केल्या होत्या. २०१४ मध्ये कार्लसन आणि आनंद यांच्यातील लढतीत दोघांकडूनही चुका झाल्या होत्या. सलग इतक्या लढती खेळल्यानंतर तुम्हाला दडपण जाणवणे आणि त्यानंतर चुका होणे स्वाभाविक असते,’’ असे कास्पारोव्हने नमूद केले.

हेही वाचा : दृढनिश्चयाचा विजय!

‘‘गुकेशच्या या जगज्जेतेपदामुळे भारतीय बुद्धिबळासाठी आधीच यशस्वी ठरलेले वर्ष आता अधिकच खास ठरले आहे,’’ असेही कास्पारोव्ह म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garry kasparov praises d gukesh for becoming youngest world champion css