गॅरी बॅलन्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ३८९ धावांची आघाडी मिळवत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आपली बाजू बळकट केली. विजयासाठी श्रीलंकेपुढे शेवटच्या दिवशी ३९० धावांचे लक्ष्य असेल.
लॉर्ड्सवरील या सामन्यात गॅरीने कसोटी कारकीर्दीतील पहिलेच शतक झळकावणे ही इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ठरली. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २६७ धावा करीत डाव घोषित केला. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या २४ वर्षीय गॅरीने नाबाद १०४ धावा केल्या. पहिल्या व मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर इंग्लंडची ६ बाद १२१ अशी स्थिती झाली होती. पण गॅरीने ख्रिस जॉर्डन याच्या साथीने सातव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.
त्याआधी, सकाळच्या सत्रात श्रीलंकेचा पहिला डाव ४५३ धावांमध्ये आटोपला. कर्णधार अँजेलो मॅथ्युज याने आपले शतक पूर्ण करताना दमदार १०२ धावा केल्या. इंग्लंडला पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळाली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ९ बाद ५७५ घोषित व ८ बाद २६७ घोषित (गॅरी बॅलन्स नाबाद १०४, शमिंदा एरंगा ३/६३)
श्रीलंका : पहिला डाव ४५३ (कुमार संगकारा १४७, अँजेलो मॅथ्युज १०२, जेम्स अँडरसन ३/९३, ).

Story img Loader